बीड : अवैध वाळू माफियांच्या ट्रॅक्टरने घेतला आणखी एक बळी | पुढारी

बीड : अवैध वाळू माफियांच्या ट्रॅक्टरने घेतला आणखी एक बळी

गेवराई (बीड) ; पुढारी वृत्तसेवा : राक्षभुवन येथून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे चाक अंगावर जाऊन एकाचा जागीच मृत्यू झाला. शिवाजी भाऊसाहेब आहेर असे युवकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि. ९, जून) गेवराई येथील तळणेवाडी परिसरात घडली. सदरील ठिकाण हे गेवराई पोलिस ठाणे कार्यक्षेत्रांतर्गत येते. गेवराई पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही.

राक्षभुवन येथून अवैध वाळूचे ट्रॅक्टरची टॉली भरुन ती तळणेवाडी येथे वाळू उतरण्यासाठी जात होती. यावेळी शिवाजी भाऊसाहेब आहेर (वय २८ रा. राक्षभुवन, ता. गेवराई) हा युवक ट्रॅक्टर चालकासोबत होता. दरम्यान तळणेवाडी शिवारात ट्रॅक्टर खड्ड्यात आदळल्याने शिवाजी हा रोडवर पडला. त्याच्या अंगावरुन ट्रॅक्टरचे मोठे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप या घटनेबाबत कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.

युवकांचा नाहक बळी

तालुक्यातील अवैध वाळू उपसा व वाहतुक थांबायचे नाव घेत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी ट्रॅक्टरवर मजुरी करणाऱ्या गरिबांच्या युवकांचा नाहक बळी जात आहे. ना कोणाची तक्रार केली जात आहे, ना कोणावर गुन्हा दाखल करण्यात आहे. याउलट घडलेले प्रकरण हे जागीच दाबत असल्याची चर्चा नागरिकांमधून दिसत आहे.

हेही वाचा

Back to top button