IPL Matches : आयपीएल सामन्यांच्या संख्येत दर हंगाम होणार वाढ! BCCI घेणार निर्णय | पुढारी

IPL Matches : आयपीएल सामन्यांच्या संख्येत दर हंगाम होणार वाढ! BCCI घेणार निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या पुढील हंगामात (IPL 2023) सामन्यांची संख्या वाढू शकते. याबाबत बीसीसीआयने संकेत दिले असून आयपीएलमध्ये 2027 पर्यंतच्या हंगामात 94 सामने खेळवले जाऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे. आयपीएल 2022 मध्ये एकूण 74 सामने खेळले गेले. एका मोसमातील सामन्यांची ही सर्वात जास्त संख्या आहे. यापूर्वी 2021 च्या मोसमात 60 सामने झाले होते. 2023-2027 या हंगामात आयपीएलमध्ये एकूण 410 सामने खेळले जाऊ शकतात. बीसीसीआय आयपीएलमधील प्रत्येक दोन हंगामानंतर सामन्यांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे. (IPL Matches)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2023 आणि 2024 च्या हंगामामध्ये 74 सामने खेळवले जातील. यानंतर, त्यापुढील दोन हंगामात (2025-2026) 84 सामने तर, आयपीएल 2027 मध्ये 94 सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे. येत्या हंगामातही 94 सामने खेळवले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. तथापि, बीसीसीआय एका हंगामातील सामन्यांची संख्या 84 ठेवण्याचा विचार करत आहे. जास्त सामन्यांमुळे स्पर्धा लांबते आणि प्रेक्षकही याकडे पाठ फिरवायला लागतात. (IPL Matches)

मीडिया हक्क विकत घेतलेल्यांना 410 सामन्यांची माहिती

बीसीसीआयने मीडिया हक्क विकत घेऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांना सांगितले आहे की 2023 ते 2027 दरम्यान एकूण 410 सामने खेळवले जातील. त्याच वेळी, आतापर्यंत पुढील टप्प्यात आयपीएलच्या एकूण सामन्यांची संख्या 370 होईल असा अंदाज वर्तवला जात होता. (IPL Matches)

तथापि, संपूर्ण स्पर्धा 84 सामन्यांमध्ये संपेल की 94 सामन्यांमध्ये संपेल याबाबत बीसीसीआयने अद्याप स्पष्ट केलेले नाही. 94 सामन्यांच्या स्पर्धेत, सर्व संघ आपापसात दोन सामने खेळतील आणि त्यानंतर प्लेऑफमध्ये चार सामने खेळतील, परंतु 84 सामन्यांचे स्वरूप समजणे कठीण आहे. (IPL Matches)

काय परिणाम होईल?

सामन्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे, मीडिया हक्कांसाठी बोली लावणाऱ्या कंपन्या मोठी बोली लावतील. अधिक सामने झाल्यामुळे, सामना प्रसारित करणाऱ्या चॅनेलला जाहिरातीसाठी अधिक वेळ मिळेल आणि त्यांची कमाई वाढेल. परिणामी अनेक कंपन्या आयपीएलचे मीडिया हक्क विकत घेण्यासाठी मोठ्या बोली लावतील आणि याचा बीसीसीआयला फायदा होईल.

मात्र, सामन्यांची संख्या वाढल्याने आयपीएलमधील प्रेक्षकांची उत्सुकता कमी होऊ शकते. आयपीएल 2022 मध्ये 74 सामने खेळले गेले आणि प्रेक्षकसंख्या कमी झाली. लांबलचक स्पर्धा हे प्रेक्षकांच्या संख्येत घट होण्याचे प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. आगामी काळात सामन्यांची संख्या वाढल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी कमी होऊ शकते, असेही तज्ज्ञांचे मत आहे. (IPL Matches)

Back to top button