शिवराज्याभिषेक : राष्ट्रीयत्वाचा उद्घोष | पुढारी

शिवराज्याभिषेक : राष्ट्रीयत्वाचा उद्घोष

सदानंद कदम (इतिहास संशोधक)

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारतीय राष्ट्रीयत्वाचा जाहीर उद्घोष होता. त्याचे दूरगामी परिणाम भारतीय राजकारणावर झाले. अवघ्या हिंदुस्थानच्या राजकीय इतिहासाला वळण देणारी अशी ती घटना होती, हे पुढच्या इतिहासावरून दिसून येते. आज शिवराज्याभिषेक दिन. त्यानिमित्त…

 

मोगलशाहीने अवघा उत्तर भारत व्यापला होता. दक्षिणेत आदिलशाही आणि कुतूबशाही नांदत होती. अगदी शहाजीराजांपासून अनेक मराठा सरदार स्वत:ला राजे म्हणवून घेत होते; पण स्वत:ला विधिवत राज्याभिषेक करवून घेणारे, विजयनगरच्या राजांच्या नंतरचे पहिले हिंदू राजे शिवाजी महाराजच होते. ‘सभासद’ बखरीच्या नोंदीनुसार एक कोटी बेचाळीस लाख होन इतका खर्च शिवरायांनी या समारंभासाठी केला होता. त्याची रसभरीत वर्णने अनेक बखरीतून दिसतात. हा समारंभ राजांनी मोठ्या दूरद‍ृष्टीने घडवून आणला. इथल्या रयतेच्या मनात राष्ट्रीयत्वाचे बीज पेरणारी ती घटना होती.

 

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची दखलही आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. राज्याभिषेकासाठी आवश्यक असे बाहुबल आणि भूमी राजांनी आधीच मिळवलेली होती. त्याकाळात स्वत:ला राजे म्हणवून घेणारे सारा गोळा करायचे ते आदिलशहाचे किंवा मुघलांचे मांडलिक म्हणूनच. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करवून घेऊन हे सारा वसुलीचे सगळे अधिकार स्वत:कडे घेतले. त्यांनी लोककल्याणकारी राज्य स्थापन करून दाखवले. म्हणूनच आज साडेतीनशे वर्षांनंतरही त्या स्वराज्याच्या नौबती सगळीकडे दुमदुमताहेत. त्यांच्या राज्याभिषेक दिनाला हजारोंच्या संख्येने लोक रायगडी जाताहेत.

 

दि. 6 जून 1674 रोजी रायगडी झालेल्या राज्याभिषेक सोहळ्याला डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रजांनाही आमंत्रण धाडले होते. या सगळ्या सत्तांचे अधिकृत प्रतिनिधीही या समारंभाला हजर होते. त्याचे अनेक तपशील त्या प्रतिनिधींनी आणि त्यांच्यासोबत आलेल्या कर्मचार्‍यांनी नोंदवून ठेवले आहेत. इंग्रजांच्या पथकातून आलेल्या डॉ. फ्रायरने तर त्यावेळच्या सजलेल्या रायगडाचे अप्रतिम वर्णन केले आहे. राज्याभिषेकापूर्वी फ्रेंच प्रवासी अबे कारे हा महाराष्ट्रात आला होता. या कारेला शिवाजी महाराजांच्या आरमाराकडून व्हिसा परवाना घ्यावा लागला होता. हे या भूमीत पहिल्यांदाच घडत होते. तशी नोंदच त्याने करून ठेवली आहे.

महाराजांच्या राज्याभिषेकाचे परिणाम इथल्या कारभारातूनही दिसू लागले. त्यापूर्वी आपल्या कागदपत्रातील भाषेवर फारसीचा प्रभाव होता; पण शिवाजी महाराजांनी ‘राज्यव्यवहार कोष’ तयार करवून घेतला आणि हळूहळू ही परिस्थिती बदलत गेली. पत्रव्यवहारावरील फारसीचा प्रभाव कमी कमी होत गेला. संभाजी महाराजांच्या काळात तर असे केवळ पंचवीस टक्केच शब्द राहिले. लोककल्याणकारी कारभाराला गती आली. शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली गेली. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना बिनव्याजी कर्जे दिली गेली. पोर्तुगीजांच्या मिठावर जबर जकात बसवून देशी मिठाच्या व्यापाराला बळकटी आणली गेली. नव्या व्यापारी पेठा वसविल्या. लढाईत मारल्या गेलेल्या मावळ्यांच्या विधवांच्या आणि पोरक्या झालेल्या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली गेली. त्यासाठी ‘बालपरवेशी’ पद्धत सुरू केली. या सार्‍याला रयतेचे पाठबळ मिळाले. कारण, याची सुरुवात एका अभिषिक्‍त राजाकडून झाली होती. लोककल्याणकारी राज्याची उद्घोषणाच या राज्याभिषेकाने झाली.

राज्याभिषेकानंतर औरंगजेबाने या राज्यावर आक्रमण केले; पण महाराज असेपर्यंत तो दक्षिणेत उतरला नाही. त्यानंतर तो आला आणि आदिलशाही, कुतूबशाहीची राजवट मोठी परंपरा असतानाही त्याने अवघ्या दोन वर्षांत नेस्तनाबूत केली; पण महाराजांचे स्वराज्य तर केवळ सहा-सात वर्षांचे होते, तरीही त्याला उणीपुरी सत्तावीस वर्षे कडवी झुंज द्यावी लागली, तरीही त्याला आले ते अपयशच. संभाजीराजांनंतर राजाराम आणि ताराबाईसाहेबांची राजवट सुरू होती. संताजी आणि धनाजी यांच्यामध्ये बेबनाव झाला होता. दोघे एकमेकांविरुद्ध लढलेही; पण यापैकी एकानेही औरंगजेबाचा आश्रय घेतला नव्हता. ते स्वराज्याशी एकनिष्ठच होते आणि अखेरपर्यंत एकनिष्ठच राहिले. शिवाजी महाराजांनी पेरलेल्या राष्ट्रीयत्वाच्या बीजाला आलेले हे फळ होते. त्यापूर्वी मराठे एकमेकांत भांडले की, थेट शत्रूला जाऊन मिळत होते. ती परिस्थिती राज्याभिषेकानंतर पालटली होती. इथल्या रयतेच्या मनामनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित झालेली होती. मराठ्यांमधील या राष्ट्रीयत्वाचा गौरव करताना जदुनाथ सरकार म्हणतात, ‘मराठ्यांचा हा गुण जग जिंकू शकणारा होता.’
त्याच भावनेपोटी पुढे पेशव्यांनी हिंदुस्थानचे पालकत्व घेतले आणि याच राष्ट्रीयत्वापोटी मराठे पानिपतच्या लढाईत उतरले. हा देश इंग्रजांनी मोगलांकडून नव्हे, तर मराठ्यांकडून घेतला हे सत्य विसरून चालणार नाही. 1857 च्या उठावानंतर बहादुरशहा जफरला इंग्रजांनी कैद केले. त्यालाही संरक्षण होते ते मराठ्यांचेच. इंग्रजांनी हा देश ताब्यात घेतला तो 1818 ला, तो मराठ्यांकडूनच. मराठ्यांत ही प्रेरणा आणि सामर्थ्य आले होते, त्याची बीजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकात होती. या सगळ्यामागे प्रेरणा होती ती राष्ट्रीयत्वाचीच आणि ती निर्माण केली होती शिवाजी महाराजांनी. शिवराज्याभिषेकाचे सामाजिक परिणामही झाले. महाराजांनी अनेक अंधश्रद्धा मोडीत काढल्या. त्यांच्या अष्टप्रधान मंडळात हंबीरराव मोहिते वगळता सगळे ब्राह्मण होते. त्यापूर्वी ब्राह्मणांनी केवळ लिखापढी करावी, धर्मकारण करावे असा दंडक होता; पण शिवाजी महाराजानी त्यांच्या हाती तलवार दिली. स्वराज्यात कुठल्याही किल्ल्यावर कधीही एका जातीचे लोक ठेवले नाहीत. अठरापगड जातीच्या लोकांच्या हातीच स्वराज्यातले सगळे गडकोट होते. गडाखालील प्रदेशाचे देशमुख, देशपांडे, कुलकर्णी, पाटील, चौगुले असे जे मुलकी अधिकारी असतील, त्यांना त्यांच्या राहत्या गावाजवळच्या दुर्गाचा कारभार सांगू नये, पाच-दहा गावे दूरच्या दुर्गावरील कारभार सांगावा, असा दंडकच होता. आजच्या लोकशाही व्यवस्थेतल्या नेमणुका अशाच तर होतात.

महाराजांंनी स्वराज्य उभे केले होतेच; पण त्यांना सुराज्य उभे करायचे होते. राज्याभिषेक ही त्या सुराज्याची नांदी होती. आपणही राज्यकर्ते होऊ शकतो, ही प्रेरणा इथल्या मनामनांत निर्माण केली ती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने. आजच्या राज्याभिषेक दिनी संकल्प करायला हवा तो स्वराज्याचे सुराज्य करण्याचा! महाराजांची मुद्रा शोभत होती ती लोककल्याणार्थ. तिचा उद्घोष महाराजांनी उच्चरवाने केला तो आजच्याच दिवशी!

Back to top button