पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी सात जुलैला प्रसिद्ध होणार | पुढारी

पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी सात जुलैला प्रसिद्ध होणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या त्रिसदस्यीय प्रभागरचनेस अंतिम मंजुरी मिळून आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. आता प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पालिकेस दिले आहेत. त्यानुसार 17 जून ते 7 जुलै असा कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 7 जुलैला प्रसिद्ध केली जाईल.

त्रिसदस्यीय 46 प्रभागरचनेला आयोगाने 12 मे रोजी अंतिम मंजुरी दिली. पालिकेने प्रभागरचना 13 मे रोजी प्रसिद्ध केली. प्रभागरचनेची आरक्षण सोडत 31 मे रोजी काढण्यात आली. त्यात एकूण 139 जागांमधून एससी, एसटी व महिला राखीव जागा निश्चित करण्यात आल्या. त्यानंतर आयोगाने गुरूवारी 2 जून रोजी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणूक विभागाकडून कार्यवाही सुरू केली आहे.

साखर परिषद: दूरगामी दृष्टी, संकल्प आणि तंत्रज्ञानाधिष्ठीत उपायोजना ही साखर उद्योगासाठी त्रिसूत्री: शरद पवार

प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम 16 जूनपर्यंत पालिकेस पूर्ण करावे लागणार आहे. ती प्रारूप मतदार यादी 17 जूनला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर 17 ते 25 जून असे 9 दिवसांच्या कालावधीत सूचना व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. अंतिम मतदार यादी 7 जुलैला प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने 31 मे 2022 पर्यंत अद्ययावत केलेली पिंपरी, चिंचवड, भोसरी व भोर या चार विधानसभेची मतदार यादी वापरली जाणार आहे. वरील तारखेपर्यंत नाव नोंदणी केलेल्या नागरिकांना महापालिका निवडणुकीत मतदान करता येऊ शकेल.

पोलिस पाटलांना सहकारी संस्थांमध्ये निवडणूक लढवण्याची संधी

यादी 17 जूनपासून नागरिकांसाठी उपलब्ध

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार प्रभागनिहाय मतदार यादीचे काम महापालिकेकडून सुरू झाले आहे. प्रारूप मतदार यादी 17 जूनला प्रसिद्ध केली जाईल. ती पालिकेच्या संकेतस्थळावर नागरिकांना पाहता येईल. तसेच, निवडणूक विभागात यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

 

Back to top button