‘टार्गेट किलिंग’ सत्रानंतर ९० टक्के हिंदूंनी रातोरात घर सोडले | पुढारी

‘टार्गेट किलिंग’ सत्रानंतर ९० टक्के हिंदूंनी रातोरात घर सोडले

श्रीनगर ; वृत्तसंस्था : काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांकडून हिंदूंचे ‘टार्गेट किलिंग’ सुरूच असल्याने आता खोर्‍यातील उरलेसुरले हिंदू आपापली घरे रिकामी करून जाऊ लागले आहेत. पॅकेजअंतर्गत रहिवासासाठी प्राप्त झालेल्या अनंतनाग येथील मट्टन भागातील पंडित कॉलनीत आता सामसूम आहे. कॉलनीतील 90 टक्के लोक घर सोडून गेले आहेत.

विद्यालयात उर्वरित सारेच शिक्षक, शिक्षिका मुस्लिम असताना रजनी बाला या एकमेव हिंदू शिक्षिकेची दहशतवादी अचूक निवड कशी करू शकतात. रजनी बाला यांच्यावरच गोळ्या कशा झाडू शकतात, हे प्रश्न काश्मिरातील हिंदूंना सतावत आहेत. दहशतवाद्यांना आपल्या सोबतचेच लोक माहिती पुरवतात, हा संशय दिवसागणिक घडणार्‍या ‘टार्गेट किलिंग’मुळे खात्रीचे रूप धारण करत आहे आणि खोरे पुन्हा एकदा हिंदूंकडून रिकामे केले जात आहे.

अनंतनागमधील पंडित कॉलनीत आता 10 टक्के हिंदू उरले आहेत. सुरक्षित स्थळी आम्हाला हलवा आणि तोवर इथे सुरक्षा पुरवा, अशी आर्त मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनातील हिंदू कर्मचार्‍यांना मुख्यालयात हलविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

22 दिवसांत 9 हत्या

गेल्या 22 दिवसांत 9 हत्या दहशतवाद्यांनी केल्या आहेत. यात 5 हिंदू आणि 3 सुरक्षा दलाचे जवान आहेत.

सर्वांना ठार करू

‘काश्मीर फ्रीडम फायटर’ नावाच्या स्थानिक दहशतवादी गटाने एक पत्र गुरुवारी जारी केले असून, सर्वांचा शेवट असाच होईल, अशी धमकी दिलेली आहे.

1990 च्या कटू आठवणी

गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 1990 मध्ये 219 काश्मिरी हिंदूंची हत्या झाली होती. खोर्‍यातून तेव्हा हिंदूंचे सर्वांत मोठे पलायन झाले होते. एका अंदाजानुसार तेव्हा 1 लाख 20 हजार हिंदूंनी काश्मीर सोडले होते.

Back to top button