Dhule : शेतात पुरून ठेवलेला अवैध मद्याचा साठा जप्त | पुढारी

Dhule : शेतात पुरून ठेवलेला अवैध मद्याचा साठा जप्त

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शेतात पुरून ठेवलेला अवैध मद्याचा साठा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणात चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा मद्याचा साठा हरियाणा राज्यातून धुळ्यात आणला गेला. धुळ्यातून गुजरात राज्यात या साठ्याची तस्करी होत असल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे.

साक्री तालुक्यातील शिवपाडा, नंदवन शिवारामध्ये अवैध मद्याचा साठा असून हा साठा गुजरात राज्यात तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक योगेश राऊत, कर्मचारी रफिक पठाण, प्रभाकर बैसाने, संजय पाटील, संतोष हिरे, गौतम सपकाळे, राहुल सानप, मयुर पाटील आदींनी नांदवन शिवारातील अतुल देसले यांच्या शेतावर छापा टाकला. यावेळी शेतात पुरून ठेवलेला सुमारे एक लाख 51 हजार रुपये किमतीचा मद्यसाठा आढळून आला.

यात मॅकडोवेल कंपनीचे मद्याचे 30 बॉक्स तसेच 85 हजार 680 रुपये किमतीचे आणखी 17 बॉक्स आढळून आले. याच क्षेत्रात आणखी दोन लाख 55 हजार रुपये किमतीच्या व्होडका मद्याचे 28 बॉक्स आणि तीन लाख 88 हजार रुपये किमतीचे मॅजिक मोमेंट व्होडका कंपनीचे पंचेचाळीस बॉक्स आढळून आले आहे.यातील काही मद्याचा साठा चिंतामण उखा मालचे यांच्या शेतातून देखील जप्त करण्यात आला आहे.

प्राथमिक तपासामध्ये हा मद्याचा साठा परराज्यातून सुलतान नावाच्या व्यक्तीच्या मदतीने धुळे जिल्ह्यात आणला गेला. यानंतर यातील काही मद्यसाठा विशाल विनायक वाघ आणि अतुल आत्माराम देसले या दोघांनी गुजरात राज्यात विक्रीसाठी घेऊन जात असताना त्यांना तारापूर पोलीस स्टेशन अंतर्गत कारवाई करून पकडण्यात आले. यासंदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल असून ते सध्या जेलमध्ये असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान अवैध मद्यसाठा बाळगल्या प्रकरणात विशाल वाघ, अतुल आत्माराम देसले, चिंतामण उखा मालचे व सुलतान यांच्याविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात भादवि कलम 420 सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button