पायांवरून ओळखा आरोग्य | पुढारी | पुढारी

पायांवरून ओळखा आरोग्य | पुढारी

आपल्याला काही दुखलं, खुपलं किंवा बरं वाटत नसलं की ते सगळं आपल्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसतं, असं आपल्याला वाटतं; पण आता एका नव्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे की, आपल्या आरोग्याची सगळी खबरबात आपल्या पायांवरून समजते. 

तुम्हालाही तुमच्या पायांवरून हे ओळखता येते, विशेषत: महिलांनी हे करावे. कारण डॉक्टरकडे जायचा त्यांना नेहमी कंटाळा असतो. तुम्ही तुमच्या पायाकडे काही मिनिटे काळजीपूर्वक पाहिलेत तर तुम्ही किती निरोगी किंवा फीट आहात हे लगेच कळून येते. डॉक्टरही म्हणतात की शरीरात कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर त्याचा प्रभाव सगळ्यात आधी पायांवरच दिसून येते. 

तुम्हाला पायांवरून तुमचे आरोग्य तपासायचे असेल तर खालील गोष्टींकडे लक्ष द्या.

कॅल्शियमची कमतरता

संबंधित बातम्या

शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर नखे पांढरीफटक पडतात. तुम्ही योग्य आहार घेत नसलात तरीही नखे पांढरी पडतात. पायाची नखे पांढरी पडली असली तर तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे. यासाठी आहारात दूध, ताक आणि इतर दुधाचे पदार्थ समाविष्ट करा. आवश्यकता असल्यास कॅल्शियमच्या गोळ्याही घ्या. 

हिमोग्लोबिनचा स्तर

तुमच्या पायांची नखे जर पिवळी होत असतील तर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिन कमी आहे. हे थायरॉईडमुळे होते. तुम्ही चाळिशी पार केली असेल तर असे होण्याची शक्यता अधिक असते. 

शरीरात पाण्याची कमतरता

पायाला भेगा पडल्या असतील तर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे. काही महिलांच्या पायांना वर्षभर भेगा असतात. डॉक्टर मंडळींच्या म्हणण्यानुसार हिवाळ्यात जर भेगा पडत असतील तर चिंतेचे कारण नाही; पण जर वर्षभर पायांना भेगा असतील तर शरीरात पाण्याची कमतरता आहे, हेच यावरून दिसते. यावर उपाय म्हणजे रोज अधिकाधिक पाणी प्या. याशिवाय फळांचे रस घ्या. पायांना सतत भेगा पडण्याने इन्फेक्शनही होऊ शकते. गर्भवती महिलांच्या पायांना भेगा पडत असतील तर त्यांच्या शरीरात कॅल्शियम, पोटॅशियम किंवा मॅग्‍नेशियमची कमतरता आहे. यावर उपाय आहे तो संतुलित आहाराचा. 

डॅमेज नर्वस सिस्टीम

कधी कधी आपले पाय सुन्‍न होतात किंवा कधी पायांत काही तरी टोचल्यासारख्या वेदना होतात. याचा अर्थ आपल्या शरीरातील मज्जाव्यवस्था व्यवस्थित काम देत नाहीये. मधुमेह किंवा अधिक मद्यपान केल्याने असे होऊ शकते. 

मधुमेहाचा संकेत

पायावर सूज येत असेल आणि ती बरेच दिवस राहत असेल तर हे मधुमेहाचे लक्षण आहे. असे घडल्यास ताबडतोब मधुमेहाची चाचणी करून घेणे चांगले.

– अनिल विद्याधर

Back to top button