पाणी-गरम की गार? | पुढारी | पुढारी

पाणी-गरम की गार? | पुढारी

डॉ. संजय गायकवाड

गरम पाणी प्यावे की गार, कुठल्या पाण्याचे जास्त फायदे होतात, गरम पाणी आरोग्यासाठी चांगले की गार? या प्रश्‍नांबाबत बरेच जण गोंधळून गेलेले आढळतात. ‘पाणी-गरम की गार?’या प्रश्‍नाच्या उत्तरांपर्यंत जाऊ पाहणारा हा लेख.

सामान्यत: असे आढळते की, पावसाळ्यात जास्त करून पाण्यासंबंधीचे आजार अधिक प्रमाणात होतात आणि पसरतात. खासकरून पोटाचे आजार वरचेवर होण्याची शक्यता असते. म्हणून डॉक्टरदेखील पावसाळ्याच्या दिवसात गरम पाणी आवर्जून पिण्याचा सल्ला देतात. अर्थात गरम पाण्याचे लाभ केवळ काही ऋतूंपुरतेच सीमित आहेत असे मुळीच नाही. एकूणच गरम पाणी पिणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आयुर्वेद आणि विज्ञानदेखील गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. अर्थात आपल्याकडे जास्त करून लोक गरम पाणी पीत नाहीत. कारण बहुतेकांना गरम पाण्याचे फायदे माहीतच नसतात. खरं तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चांगल्या आरोग्यासाठी आपण दिवसातून कमीत कमी 8-10 ग्लास पाणी प्यायला हवे; पण जर आपण दिवसातून 3 वेळा गरम पाणी पीत असाल तर याचे आपल्याला खूप फायदे होतील. गरम पाणी आपल्याला बर्‍याच आजारांपासून दूर ठेवते व आपले आरोग्य चांगले ठेवते. गरम पाणी प्यायल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते. याचे आपल्या त्वचेसंदर्भानेदेखील चांगले फायदे होतात, हे आजवरच्या अनेक प्रयोगांमधून सिद्ध झाले आहे.

आपले वजन वाढतच असेल आणि कितीही प्रयत्न केले तरी कमी होत नसेल तर गरम पाण्यात मध आणि लिंबू पिळून सतत 3 महिने हे प्या. आपल्याला याचा खूप फायदा होईल आणि हळूहळू आपल्याला वजनाबाबतीतला फरक जाणवेल. गरम पाणी आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी वाढू देत नाही आणि चरबी हळूहळू कमी करते. जेवल्यानंतर 1 कप गरम पाणी पिण्यास सुरुवात करा. याचा आपल्याला फायदा होईल.

आपल्याला कधी कधी जाणवते की जरा वेळ उन्हात किंवा थंडीत बाहेर गेल्यावर सर्दी-खोकला होतो. याच्यावर जास्त काही करण्याची गरज नाही. आपण रोज 3 ग्लास गरम पाणी पीत जा, असे केल्याने आपल्याला आराम मिळेल. कधी कधी अनपेक्षितपणे आपल्याला सर्दी-खोकला होतो. अशावेळी गरम पाणी प्यायल्याने सर्दी खोकला जातो. गरम पाणी प्यायल्याने घशात खवखवणे, कफ, आवाज बसणे इत्यादी घशासंबंधी आजार दूर होण्यास फार मदत मिळते. विशेषत: महिलांनी गरम पाण्याचा पिण्यासाठी वापर जास्तीत जास्त करावा, असे सुचवले जाते. कारण पाळीमुळे महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यावेळी गरम पाण्याने पोटाला शेक दिल्याने आराम मिळतो. त्यामुळे पाळीच्या दिवसात थोडे थोडे गरम पाणी पीत जावे, असे सांगतात.

गरम पाणी प्यायल्याने शरीरात निर्विशीकरण होते. पाणी शरीराचे शुद्धीकरण करून शरीरातील अशुद्धी दूर करते. गरम पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे घाम येतो. घाम आल्याने शरीरातील अशुद्धी दूर होतात. गरम पाण्यामुळे पोटासंबंधी विकार दूर होतात. ज्यांना गॅस आणि बद्धकोष्ठता होते त्यांना गरम पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. म्हणून दिवसातून 2-3 वेळा तरी गरम पाणी प्या.

आपले शरीर दुखत असेल तर आपल्याला गरम पाण्याचे सेवन आवर्जून केले पाहिजे. गरम पाणी प्यायल्याने आपल्याला डोकेदुखी, पोटदुखी आणि शरीराचे दुखणे या समस्यांपासून आराम मिळेल. आपल्या त्वचेसंबंधी वारंवार समस्या होणार नाहीत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गरम पाणी प्यायल्याने आपल्या त्वचेत ओलावा राहतो. त्यामुळे त्वचेच्या रोगांपासून बचाव होतो. याच्या व्यतिरिक्त गरम पाणी केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे केसांचा चमकदारपणा वाढतो, तसेच केसांच्या वाढीसाठीही मदतकारक ठरते. प्रामुख्याने गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, पचनक्रिया सुधारल्याने एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. त्यामुळे जेवल्यानंतर एक कप गरम पाणी पीत जा, असा सल्ला आवर्जून दिला जातो. जसजसे आपण उतारवयाकडे झुकतो, तसतसे चेहर्‍यावर पडणार्‍या सुरकुत्यांमुळे आपण चिंतीत होत जातो. सुरकुत्या येणे ही एक नैसर्गिक बाब आहे, परंतु इतरांच्या तुलनेत जास्त व लवकर चेहर्‍यावर सुरकुत्या येत असतील तर ही चिंतेची बाब आहे. ही समस्या दूर करायची असेल तर त्यासाठी गरम पाणी प्यायला सुरुवात करा. काही दिवसांतच आपल्याला फरक जाणवेल. आपली त्वचा चमकदार होईल, चेहर्‍यावरील पिंपल्स दूर होण्यास, आपल्या चेहर्‍याचा रंग उजळण्यास आणि चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळत असल्याचे आपल्याला जाणवेल.

गरम पाण्याचे इतके सारे उपयोग असूनही आपण ते समजून घेण्यात कमी पडतो असे मात्र आपल्याकडे सार्वत्रिक चित्र दिसते. गर्मीच्या दिवसात तर लोक सर्वात जास्त थंड पाणी पितात आणि जास्त करून लोक फ्रीजमधील पाणी पितात. इतकेच नाही तर अनेकजण बाहेरून, उन्हातून आल्या आल्या ते फ्रीजमधील थंड पाणी पितात. थंड पाणी प्यायल्यामुळे आपल्याला आराम मिळतो, पण याचे काही दुष्परिणामदेखील आहेत. सतत थंड पाणी पिण्याने बरेच आजारदेखील होतात आणि फ्रीजचे थंड पाणी पिण्याने तर जास्त आणि दूरगामी नुकसान होण्याची शक्यता असते. फ्रीजमधील थंड पाणी आपली पचनक्रिया बिघडवण्याची शक्यता अधिक असते. फ्रीजमधील थंड पाणी प्यायल्यामुळे आपल्या पोटाच्या वाहिन्या आखडतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा प्रदान करणारे तत्त्व आणि नसा कमजोर होतात. म्हणून आपण फ्रीजमधील थंड पाणी पिण्याचे टाळलेलेच बरे!

अर्थात या अनुषंगाने आपल्याला आपल्या शरीराच्या तापमानाबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. मग आपल्याला लक्षात येईल की शरीराच्या तापमानानुसार आपल्याला कोणतं पाणी प्यायला हवे ते. माणसाच्या शरीराचे तापमान 98 डिग्री सेल्सियस असते. त्यानुसार शरीरासाठी 20-22 डिग्री तापमान असलेले पाणी योग्य असते. जर आपण याहून जास्त थंड पाणी पित असाल तर हे पाणी पचवायला शरीर जास्त वेळ घेईल हे निश्‍चित आहे. बर्फाचे पाणी पचण्यासाठी 6 तास लागतात तसेच पाणी गरम करून ते पाणी थंड झाल्यावर पिण्याने पाणी पचायला 3 तास लागतात. कोमट पाणी तर फक्त 1 तासात पचते व मायग्रेनपासून दूर ठेवते, असेही सांगतात. थंड पाणी पिण्याने आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यापायी शरीरात बल्गम जमा होतो, रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते आणि आपल्याला सर्दी, खोकला असे त्रास वारंवार होण्याची शक्यता वाढते, असे अनेक अभ्यासांतून समोर आले आहे. आपल्याला कदाचित माहीत नसेल; थंड पाणी पिण्याने आपल्याला मूळव्याधीसारखी समस्याही होऊ शकते. हा त्रास खूप अडचणीचा व वेदनादायी असतो. या सगळ्या कारणांमुळे फ्रीजमधील थंड पाणी पिणे टाळलेलेच उत्तम; नाही का?

Back to top button