जिल्हाभरात 1958 बालके कुपोषित | पुढारी | पुढारी

जिल्हाभरात 1958 बालके कुपोषित | पुढारी

हिंगोली : प्रतिनिधी

जिल्हाभरात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाड्यात दरमहा बालकांचे वजन घेतले जात असते. यात जवळपास 1 हजार 958 बालके कुपोषित आढळल्याची माहिती समोर आली आहे. सदर बालकांना योग्य पोषण आहार देऊन कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी बालविकास केंद्राची स्थापना करण्यात येणार होती. मात्र यासाठीची निविदाच वादात अडकल्याने राज्यभरासह जिल्ह्यात ही योजना ठप्प पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कुपोषणाचे प्रमाण हे वाढतच चालले आहे. 

हिंगोली जिल्ह्यात 1 हजार 89 अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यात जवळपास 1 लाख 440 बालके आहेत. यातील 82 हजार बालकांचे वजन काही महिन्यांपुर्वी घेण्यात आले होते. यामध्ये 71 हजार 560 बालके सर्वसाधारण आढळली तर 8 हजार 489 मध्यम कमी वजनाची बालके आहेत. अशा बालकांच्या मातांना महिला व बालकल्याण विभागाकडून बालकांची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. तरी सुध्दा 1 हजार 958 बालके हे तीव्र कमी वजनाची आढळून आली आहेत. या प्रकारामुळे महिला व बालकल्याण विभागाचा कारभार चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. सदरील बालकांना योग्य पोषण आहार देऊन कुपोषणातून बाहेर काढण्याकरीता बालविकास केंद्राची स्थापना करण्यात येणार होती. परंतु, यासाठीची निविदाच वादात अडकल्याने राज्यभरासह जिल्ह्यात या योजनेला अवकळा आल्याचे दिसून येत आहे.

काही महिन्यांपूर्वी शासनाने राज्य स्तरावरून कुपोषित बालकांसाठी आहार खरेदी करून तो बालविकास केंद्रात वाटप करण्यात येणार असे जाहीर करण्यात आले होते. मात्र सदर निविदाच वादात अडकल्याने शासनाकडून करण्यात आलेली तयारीही निष्फळ गेल्याचे यावरून दिसून येत 
आहे.

अशी आहे संख्या…
यात प्रकल्पनिहाय कळमनुरी 167, वसमत 343, हिंगोली 425, सेनगाव 495, औंढा नागनाथ 325, आखाडा बाळापूर 203 अशी बालकांची संख्या आहे. यापैकी 476 बालकांना तर आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली कुपोषणातून बाहेर काढणे गरजेचे आहे. यात कळमनुरी 126, वसमत 58, सेनगाव 128, औंढा 70, व आ.बाळापूर 36 अशी संख्या आहे.

Back to top button