कौतुकास्पद! पुरंदर तालुक्यातील उदाची वाडीत विधवा प्रथा बंद | पुढारी

कौतुकास्पद! पुरंदर तालुक्यातील उदाची वाडीत विधवा प्रथा बंद

सासवड : पुढारी वृत्तसेवा

परंपरेने वर्षानुवर्षे चालत आलेली विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय उदाची वाडी (ता. पुरंदर) ग्रामसभेने घेतला आहे. यामुळे गावातील विधवा महिलांची कुंचबणा थांबणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने दि. १७ मे २०२२ रोजी विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानुसार पतीच्या मृत्यूनंतर पत्नीच्या पायातील जोडवे काढणे, हातातील बांगड्या फोडणे, गळ्यातील मंगळसूत्र काढणे, या प्रथेला कायमची मूठमाती देण्यात आली आहे. या निर्णयाचे जोरदार स्वागत केले जात असून, ठिकठिकाणी अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

दौंड : जार मधील पाणी पिताय ? सावधान !

या पार्श्वभूमीवर सरपंच संतोष कुंभारकर यांच्या अध्यक्षतेखाली उदाची वाडीत ग्रामसभेचे आयोजन केले हाेते. ग्रामसभेत वैशाली कुंभारकर यांनी शासन निर्णयानुसार विधवा प्रथा बंद करून महिलांना मानसन्मान प्राप्त करून द्यावा, त्यांना सामान्य महिलांप्रमाणे सर्वच धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी होण्याचा मान मिळावा, अशी सूचना केली हाेती. या सूचनेला स्वाती एकनाथ कुंभारकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर बहुमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. याबद्दल विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी सरपंच संतोष कुंभारकर यांचे अभिनंदन केले आहे.

सावधान! आता बालकामगार ठेवणार्‍यांकडून होणार जबर दंडाची आकारणी

सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी जाधव, पोलिस पाटील रूपाली कुंभारकर, अंगणवाडीसेविका नंदा जगताप आदींनी उपस्थित विधवा महिलांना पेढे भरवून, हळदी-कुंकवाचा मान देऊन ग्रामपंचायतीच्या निर्णयाचे स्वागत केले. या वेळी उपसरपंच विद्या कुंभारकर, सदस्या छाया कुंभारकर, सुवर्णा कुंभारकर, रंजना हगवणे, मानसिंग झेंडे, ग्रामसेवक संपत भोरडे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Back to top button