मूत्र विसर्जनावेळी जळजळ होते का ? | पुढारी

मूत्र विसर्जनावेळी जळजळ होते का ?

लघवी करताना काही वेळा जळजळ होते, तेव्हा त्याला मूत्रमार्गाचा संसर्ग असे म्हटले जाते. इंग्रजीत त्याला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन अर्थात यूटीआय असे म्हणतात. हा संसर्ग पुरुष आणि स्त्रिया या दोघांनाही होऊ शकतो. प्रत्येक व्यक्‍तीला एकदा तरी हा संसर्ग होत असल्याचा अनुभव येतोच; मात्र महिलांना मूत्रमार्ग संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असते. 

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच लघवीला जळजळ होणे ही एक सर्वसामान्य समस्या आहे. मूत्र विसर्जनाशी निगडित कोणत्याही अवयवाला म्हणजे मूत्रपिंड, मूत्रमार्ग आणि मूत्राशय यांच्यामध्ये संसर्ग झाला तर त्याला यूटीआय अर्थात मूत्रमार्गाचा संसर्ग असे म्हणतात. प्रत्येक स्त्रीला एकदा तरी यूटीआयचा त्रास होतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांना यूटीआयचा त्रास होण्याचे प्रमाण अधिक असते. स्त्रियांमध्ये मूत्रमार्ग अरुंद असतो. त्यामुळे या मार्गात जीवाणू सहजपणे विकसित होतात आणि संसर्ग होतो. ‘यूटीआय ई कोलाय’ नावाच्या जीवाणूमुळे हा संसर्ग होतो. मूत्रमार्गाच्या संसर्गाची इतरही काही कारणे असतात. ती म्हणजे मूत्राशयाचा आकार बदलणे, गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करणे, गर्भावस्था किंवा रजोनिवृत्ती. यूटीआयचा त्रास होत असताना मळमळ, पाठदुखी, लघवीवेळी जळजळ आणि थकवा या समस्या भेडसावतात. यूटीआयचा त्रास होत असेल तर काही पदार्थांचे सेवन करणे व्यर्ज्य करावे. 

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनवर नैसर्गिक उपचार : 

संबंधित बातम्या

भरपूर पाणी प्यावे : पाणी हे खरोखरच अमृत असते. शरीराच्या काही समस्यांवर इलाज करण्यासाठी भरपूर पाणी सेवन करावे. अनेक आरोग्य समस्यांमध्ये तत्काळ आराम मिळण्यासाठी पाणी पिणे प्रभावी उपाय आहे. शरीरातील विषारी, टाकाऊ पदार्थ बाहेर टाकून देण्यासाठी पाण्याची मदत होते. यूटीआयमुळे शरीरात अनेक प्रकारच्या जीवाणूंचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. त्यामुळे शरीराचे शुद्धीकरण होते, तसेच जीवाणू मारले जातात. 

जास्त वेळा करा मूत्र विसर्जन : अनेकदा मूत्र विसर्जनाचा वेग अवरोधून धरतो. म्हणजे लघवी करणे टाळतो. कधी अस्वच्छता असते कधी मूत्र विसर्जनाची सोय उपलब्ध नसते म्हणून. कारण काहीही असो; पण मूत्र विसर्जनाचा वेग अडवू नये. जेव्हा वाटेल तेव्हा लघवी विसर्जित केली पाहिजे. जेव्हा मूत्रमार्गाचा संसर्ग झालेला असतो तेव्हा सतत लघवीची भावना होत असते; मात्र ते टाळू नका. संसर्ग झालेला असताना लघवी करताना जळजळ होते. त्रास होतो. पण, शरीरातील हानिकारक जीवाणू बाहेर टाकण्यासाठी मूत्राचे विसर्जन करणे आवश्यक असते. त्यामुळे जेव्हा मूत्र विसर्जनाची भावना होईल तेव्हा लघवीला जावे. 

सी जीवनसत्त्वाचे सेवन : सी जीवनसत्त्व योग्य प्रमाणात शरीरात गेल्यास लघवीमध्ये आम्लीय घटक उत्पन्‍न होण्यास मदत होते. सी जीवनसत्त्वामुळे लघवीत वाढणार्‍या जीवाणूंचा विकास होऊ देत नाही. लघवीच्या संसर्गाची समस्या भेडसावत असेल तर सी जीवनसत्त्वाचे सेवन अधिक प्रमाणात करावे. सी जीवनसत्त्वाचे फायदे जाणून घेऊ या.

सूज येणारे पदार्थ सेवन करू नये : यूटीआयची समस्या भेडसावत असेल तर काही पदार्थ सेवन करणे टाळावे. कॅफिन, मद्यपान, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. या पदार्थांमुळे मूत्राशयाला सूज येते. तंतुमय पदार्थ, कार्बोहायड्रेट असलेली पेये, पदार्थ यांचे सेवन करू शकता. या पदार्थांमुळे पचन सहजपणे होते. ती तंदुरुस्त होते. 

निरोगी जीवनशैली : मूत्रमार्गाच्या संसर्ग कमी होण्यासाठी जीवनशैलीतही काही बदल करणे मदत करू शकते. अंतर्वस्त्रे घट्ट नसावीत, धूम्रपान बंद करावे, गुप्तांगाची योग्य स्वच्छता ठेवावी. तसेच स्वच्छ उत्पादनांचा वापर करावा. शक्यतो सार्वजनिक शौचालयांचा वापर कमी करावा. 

यूटीआयपासून बचाव करण्यासाठी : 

कॅफिन : मूत्रमार्गाचा संसर्ग झाल्यास कॅफिनचे सेवन बंद करावे. कारण, त्यामुळे लघवीला जास्त जळजळ होते. यूटीआयच्या लक्षणांमध्ये वाढ होण्यास कारण ठरते. कॅफिनचे सेवन मूत्राशयातील संसर्ग वाढवतो. त्यामुळे पाणी किंवा क्रॅनबेरीच्या रसाचे सेवन करावे. त्यामुळे संसर्ग कमी होण्यास मदत होते. 

मद्यपान : मद्यपानामुळे पोट आणि मूत्राशय यांच्यामध्ये जळजळ होते. हे दोन्ही घटक संसर्गाची समस्या अधिक वाढवून गंभीर करते. त्यामुळे मद्यपान न करता इतर आरोग्यदायी पेयपदार्थ सेवन केले पाहिजेत. त्यामुळे संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होते. 

आंबट फळे : आंबट फळांमध्ये खूप जास्त प्रमाणात आम्ल असते. त्यामुळे मूत्राशयातील जीवाणूंचा विकास वेगाने वाढतो. त्यामुळे ज्या व्यक्‍तींना मूत्रमार्गाचा संसर्ग झाला आहे, त्यांनी आंबट फळांचे सेवन करू नये.

Back to top button