Congress Income : काँग्रेसच्या उत्पन्नात ५८ टक्के घट | पुढारी

Congress Income : काँग्रेसच्या उत्पन्नात ५८ टक्के घट

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात सर्वाधिक काळ सत्ता भोगलेला काँग्रेस (Congress) पक्ष राजकीय संकटापाठोपाठ आता आर्थिक संकटानेही घेरला गेला आहे. पक्षाला मोठ्या प्रमाणात निधीची चणचण भासत असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या ऑडिट रिपोर्टमध्ये काँग्रेसचे उत्पन्न (Congress Income) 2020-21 या वर्षात 58 टक्क्यांनी कमी झाल्याचे म्हटले आहे.

राजस्थानातील उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबीरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (Communist Party of India Marxist) निधी गोळा (Congress Income) करण्याच्या मॉडेलवर चर्चा झाली होती. केरळ काँग्रेसचे माजी प्रमुख रमेश चेन्नीथला यांनी हे मॉडेल स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या शिबीरात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी संसाधने जमविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली होती.

काँग्रेस नेते आणि सोनिया गांधींचे (Sonia Gandhi) राजकीय सचिव दिवंगत अहमद पटेल (Ahmed Patel) यांच्या निधनानंतर काँग्रेसला आर्थिक चटके बसू लागले आहेत. पटेल होते तेव्हा ते त्यांच्या कॉर्पोरेट आणि इतर संपर्कातून पक्षासाठी निधी उभा करण्याची जबाबदारी पार पाडत होते. ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) देखील पक्षाची आर्थिक बाजू सांभाळतात; मात्र मोदी सरकारच्या (Modi Government) कार्यकाळात काँग्रेसच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे.

गेल्या तीन वर्षांतील घटते उत्पन्न

भारतीय निवडणूक आयोगाकडे (Electionc Commission) दाखल ऑडिट रिपोर्टनुसार 2020-21 मध्ये काँग्रेसचे उत्पन्न 285.7 कोटी रुपये होते. त्याआधीच्या आर्थिक वर्षात हे उत्पन्न 682.2 कोटी रुपये इतके होते. तर 2018-19 या आर्थिक वर्षात हे उत्पन्न 918 कोटी रुपये होते.

निधीसाठी काँग्रेस स्वीकारणार केरळचे मार्क्सवादी मॉडेल

सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाप्रमाणे मार्गक्रमण करण्याची तयारी करत आहे. काँग्रेसला निधीच्या कमतरतेशी सामना करावा लागत आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी काँग्रेस डाव्या पक्षाच्या केरळ मॉडेल स्वीकारण्याची तयारी करत आहे. या मॉडेलनुसार डावे पक्ष व्यापक पातळीवर घरोघरी (डोअर टू डोअर अभियान) जाऊन निधी गोळा करतात. तसेच निधी देणार्‍यांना त्याची पावतीही दिली जाते. यामुळे पक्षाच्या निधीत वाढ तर होतेच शिवाय पक्षाचा जनसंपर्कही बळकट होतो.

Back to top button