जाणून घ्या…डिस्क प्रोफाईल  | पुढारी | पुढारी

जाणून घ्या...डिस्क प्रोफाईल  | पुढारी

साक्षी तापीकर 

व्यक्तिमत्त्व हा माणसाच्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग आहेे. एखाद्या व्यक्तीचे अंतर्गत व्यक्तिमत्त्व म्हणजे त्या व्यक्तीची Primary Personality आणि बाह्य व्यक्तिमत्त्व म्हणजे त्या व्यक्तीची secondary Personality. व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक विकास होत असतो.  या विकासातून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व तयार होत असते. शरीराचा रंग, ठेवण, बुद्धी इत्यादी गोष्टी घेऊन व्यक्ती जन्माला येते. या गोष्टी व्यक्तीला अनुवंशिकतेने मिळालेल्या असतात. बुद्धी सामर्थ्यानेदेखील कोणतीही व्यक्ती इतरांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकते.  

व्यक्तिमत्त्व विकासात शरीररचना, अंतरस्राव ग्रंथी, विविध क्षमता, आसपासचे वातावरण, कुटुंब, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, शाळा, कामाचे ठिकाण इत्यादी घटक महत्त्वाचे ठरतात. परंतु, व्यक्तीचे केवळ व्यक्तिमत्त्व चांगले असून चालत नाही, तर तिचे वर्तनही चांगले असणे गरजेचे असते. चांगल्या वर्तनामुळे आणि सकारात्मक विचारामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढायला मदत होते. कारण, सकारात्मक विचारांचा परिणाम व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर होतो. व्यक्तिमत्त्व अधिक खुलण्यासाठी माणसाने स्वतःला चांगले ओळखले पाहिजे. स्वतःमधील क्षमता, गुण काय आहेत, हे तपासून पाहिले पाहिजे.  नकारात्मक विचारांना ब्रेक लावून सकारात्मक विचारांची अ, इ, उ, ऊ  अवलंबायला पाहिजे.

मानसशास्त्रज्ञ व मानववंश शास्त्रज्ञ डॉ. विल्यम मॉर्सटन यांनी हजारो व्यक्तींच्या वर्तनाचा अभ्यास करून ‘डिस्क प्रोफाईल’ (DISC) ही संकल्पना विकसित केली.  त्यांनी 1920 मध्ये प्रबंध सादर केला. ज्यामध्ये मानवी व्यक्तिमत्त्व चार वेगवेगळ्या श्रेण्यांमध्ये वर्गीकृत केले.  प्रबळ (Dominant) , प्रभावी (influential), स्थिर (steady) आणि अनुपालक (compliant). 

‘डिस्क’ हे वैयक्तिक मूल्यांकन साधन आहे जे चाळीस दशलक्षाहून अधिक लोकांद्वारे कामाची उत्पादकता (work productivity), संघकार्य (team work) आणि संप्रेषण/ संवाद (communication) सुधारण्यासाठी वापरले जाते. लोक हे प्रोफाईल स्वतःला चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आणि त्यांचे वर्तन इतरांशी जुळवून घेण्यासाठी वापरू शकतात. ‘डिस्क प्रोफाईल’ गेल्या अनेक वर्षांपासून विक्री, विपणन, व्यवस्थापन, मनुष्यबळ विकास आणि संघटन (Marketing Management, HR, sales) अशा अनेक कारणांसाठी वापरले जाते. ‘डॉ.गॅरी क्रॉऊचर’ यांनी पण ‘बर्ड प्रोफाईल’ समाविष्ट केले.  म्हणजेच माणसाचे चार भागांत विभागलेले व्यक्तिमत्त्व गरुड (Eagle), मोर (Peacock), पारवा (Dove) आणि घुबड (Owl) या चार पक्ष्यांबरोबर जोडले गेले. 

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची स्वतःची अशी खास आणि वेगळी व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्ये असतात. व्यक्तीची ही गुण वैशिष्ट्ये या ‘DISC’ च्या माध्यमातून समजून घेऊया!

D- Dominant 

या व्यक्तींची तुलना गरुड या पक्षाशी केली जाते.  कारण ‘गरुड झेप’ घेण्याची ताकद या व्यक्तींमध्ये असते.  या व्यक्ती स्वतंत्र, स्पष्टवक्त्या, जन्मजात नेतृत्व कौशल्य असलेल्या असतात, तसेच त्या नियंत्रक, स्वयंस्फूर्त, आत्मविश्वास असणार्‍या असतात. आव्हान व निर्णय घेण्यात एकदम प्रवीण असतात. परंतु, हट्टी स्वभाव व भावनिकता कमी असते.

I- Influential 

या व्यक्तींचा संदर्भ मोर या पक्ष्याशी जोडला गेला आहे. ज्याप्रमाणे मोर आकर्षक असतो, त्याचप्रमाणे त्या व्यक्तीदेखील लोकांचे लक्ष वेधून घेणार्‍या, मनमिळावू, आनंदी, बडबड करणार्‍या स्वभावाच्या असतात.  अमर्यादित ज्ञान व संधी यांच्याकडे असते.  प्रचंड लवचिकता यांच्यामध्ये दिसते. मर्यादित धोका पत्करण्याची सवय, वेळेचे भान नसणे, शिस्तीचा अभाव, मार्गदर्शनाची गरज यांना असते.  

S- Steady

या व्यक्ती पारवा या पक्ष्याप्रमाणे स्थिर प्रवृत्तीच्या असतात. निष्ठावान, कष्टाळू, खंबीर, नातेसंबंध जपणार्‍या असतात. या व्यक्तींकडे उच्च शिक्षण क्षमता असते.  लवचिकता, गटाबरोबर राहणे, भांडण टाळणे हे गुण यांच्यात दिसून येतात. परंतु, तीव्र भावनिकता, बदल न स्वीकारणे, ताण सहन करणे हे प्रमाण अधिक असते.  

C- Compliant  

घुबड या पक्ष्याची नजर जशी तीक्ष्ण असते, अगदी तसेच साधर्म्य या व्यक्तींमध्ये जाणवते. तर्कशील, विचारी, पद्धतशीरपणा, शिस्तप्रिय, कामात अचुकता ही वैशिष्ट्ये या व्यक्तींमध्ये ठासून भरलेली असतात. या व्यक्तींमध्ये उत्सुकता खूप असते. उत्तम प्रशासक असतात. हाती घेतलेले प्रत्येक काम फोकस ठेवून करतात. प्रत्येक गोष्टीच्या खोलात जातात. का आणि कसे, असे प्रश्न सतत पडतात. अडचणींवर मात करणारे, उत्तम नियोजन करणारे, नियम बनवणारे असतात. परंतु, प्रदीर्घ निर्णय क्षमता असते. पटकन प्रतिक्रिया देत 

नाहीत.  

अशा या चार प्रकारे DISC काम करते.  आपण व आपली मुले यापैकी कोणत्या वर्गश्रेणीत अगदी चपखल बसतो हे बघण्यासाठी DMIT (Dermatoglyphics Multipule Intelligence Test) सारखी चाचणी हमखास उपयोगी पडते. कारण, या चाचणीमध्ये हाताच्या बोटांच्या ठशांवरून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, वर्तन कोणत्या प्रकारचे आहे, आपल्यात जन्मजात गुणवैशिष्ट्ये कोणती आहेत, स्वतःची प्रगती, दुर्गुणांवर मात करून पुढे कसे जावे, निर्णय क्षमता, पर्सनॅलिटीचा वापर, उत्तम करिअर निवड इत्यादी गोष्टी समजायला मदत होते  व त्याचा उपयोग नक्कीच पुढील आयुष्यात होतो. म्हणून Dermatoglyphics च्या माध्यमातून आपले ‘डिस्क प्रोफाईल’ जाणून घेणे फायद्याचे ठरते व एक वेगळी ओळखही आपल्या समोर येते.

Back to top button