सांगली : जिल्ह्यातील सोळा सहकारी संस्थांचे बिगूल | पुढारी

सांगली : जिल्ह्यातील सोळा सहकारी संस्थांचे बिगूल

सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक, सांगली अर्बन, विटा मर्चंटस, एम. डी. पवार बँक, तासगाव अर्बनसह सोळा सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला. सांगली अर्बनसाठी दि. 26 जूनला, शिक्षक बँक दि. 3 जुलै रोजी, विटा मर्चंटससाठी दि. 3 जुलै, पवार बँकेसाठी दि. 25 जूनला तर तासगाव अर्बन बँकेसाठी दि. 23 जूनला मतदान होईल. या संस्थासाठी आचारसंहिता मागील काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या सहकारी बँकांची निवडणूक जाहीर जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापणार असल्याचे स्पष्ट झाले.

कोरोनाची साथ कमी झाल्याने सहकार प्राधिकरणकडून लांबलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. चार महिन्यांपासून विकास सोसायट्यांच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुका अंतिम टप्प्यात आहेत.

सांगली अर्बन बँकेसाठी दि.26 जूनला मतदान तर दि. 28 जूनला मतमोजणी होईल. दि. 20 ते 26 मे या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येईल, शिक्षक बँकेसाठी दि. 3 जुलैला मतदान तर दि. 5 जुलैला मतमोजणी आहे. दि. 27 मे ते 2 जून या कालावधीत उमेदवारी अर्ज भरणे, दि. 6 जून ते 20 जूनपर्यंत अर्ज माघारीसाठी मुदत आहे. विटा मर्चंटससाठी दि. 27 मे ते 2 जूनपर्यंत अर्ज सादर करणे, दि. 6 जून ते 20 जून माघारीची मुदत तर 3 जुलै मतदान व दि. 6 जुलैला मतमोजणी होईल. इस्लामपूर येथील एम. डी. पवार बँकेसाठी दि. 20 ते 26 मे अर्ज सादर करणे, उमेदवारी माघारी घेण्याची मुदत दि. 30 मे ते 13 जून तर दि. 25 जूनरोजी मतदान व त्याचदिवशी मतमोजणी होणार आहे. तासगाव अर्बनसाठी दि. 20 ते 26 जून अर्ज भरणे, दि. 30 मे ते 13 जून अर्ज माघारी तर दि. 23 जूनला मतदान तर 24 जूनला मतमोजणी होईल.

पलूस येथील डॉ. पतंगराव कदम खरेदी विक्री संघासाठी दि. 24 मे 30 मे अर्ज सादर करणे, दि. 1 ते 15 जून अर्ज माघारीची मुदत, दि. 25 जून रोजी मतदान तर त्यानंतर मतमोजणी होईल. याशिवाय लोकमान्य सहकारी पतसंस्था, आष्टा, श्री दत्त सहकारी पतसंस्था, इस्लामपूर, सांगली जिल्हा पोलिस सोसायटी, सांगली, लठ्ठे शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था, सांगली, पाटबंधारे कर्मचारी सहकारी
पतसंस्था, सांगली. अहिल्यादेवी होळकर सहकारी पतसंस्था, पेड, सांगली जिल्हा परिषद अभियंता सहकारी पतसंस्था, सांगली, सिम्बायोसिस फार्मास्युटिकल्स, दरिकोन्नर सोसायटी, दरिकोन्नर (ता.जत) व जत तालुक्यातील व्हसपेठ सोसायटीच्या निवडणुकीचा समावेश आहे.

जोरदार टशन होणार

सहकारी बँका, खरेदी- विक्री संघ यांचे रणांगण कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पंधरा दिवसांपूर्वी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार सहकार विभागाच्यावतीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बुधवारी निवडणुकीचा कार्यक्रम प्रसिध्द केला. सोळा संस्थांसाठी निवडणूक कार्यक्रम आणि आचारसंहिता लागू झाली. त्या दिवसापासून पंचेचाळीस दिवसात प्रत्यक्षात मतदान होईल. सांगली अर्बन बँकेचे 60 हजार तर शिक्षक बँकेची सभासद संख्या सव्वापाच हजार आहे. त्यामुळे या संस्थांसाठी जोरदार टशन होणार असल्याचे स्पष्ट झाले.

Back to top button