नाशिक : मुक्त शिक्षणाची परंपरा समृद्ध व्हावी- राज्यपाल कोश्यारी | पुढारी

नाशिक : मुक्त शिक्षणाची परंपरा समृद्ध व्हावी- राज्यपाल कोश्यारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिक्षणापासून दूर असणार्‍या समाजघटकांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने केले आहे. मुक्त व दूरस्थ शिक्षण परंपरा अधिकाधिक समृद्ध होत जावी, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 27 व्या दीक्षांत समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते ऑनलाइन बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि कृषी वित्तीय महामंडळाचे अध्यक्ष प्रा. चारुदत्त मायी, विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्य आमदार सरोज आहिरे, कुलगुरू डॉ. पी. बी. पाटील, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे आदी उपस्थित होते.

समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे कार्य मुक्त व दूरशिक्षणामुळेच होऊ शकते. प्राचीन काळापासून भारतात ज्ञानाची परंपरा मोठी आहे. ज्या काळी पुस्तके, ग्रंथ नव्हते त्या काळी मौखिक परंपरेतून ज्ञानाचा प्रसार पिढी दर पिढी पुढे पुढे होत गेला. मुक्त विद्यापीठ वेगळ्या पद्धतीने हीच थोर परंपरा दूरस्थ शिक्षण प्रणालीद्वारे प्रभावीपणे राबवत असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

तत्पूर्वी, मान्यवरांचे तुतारी व सनईच्या स्वरात मिरवणुकीने मुख्य व्यासपीठाजवळ आगमन झाले. परीक्षा नियंत्रक बी. पी. पाटील यांनी मानदंडासह या मिरवणुकीचे नेतृत्व केले. यावेळी उदित शेठ, अनिल कुलकर्णी, प्राचार्य ज्ञानदेव नाठे, डॉ. महेंद्र लामा, डॉ. जयदीप निकम, डॉ. कविता साळुंके, डॉ. प्रवीण घोडेस्वार, प्रा. डॉ. प्रकाश देशमुख, प्रा. डॉ. माधुरी सोनवणे, डॉ. सुनंदा मोरे, डॉ. प्रमोद खंदारे, डॉ. प्रमोद बियाणी, डॉ. सुरेश पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, सोहळ्यात अंध पदवीधर चार, लष्करातील जवान 68, ज्येष्ठ नागरिक 192, पोलिस कर्मचारी 77, कारागृहातील बंदिजन 15, तर नक्षलग्रस्त भागातील 9 विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली आहे. तर विविध शिक्षणक्रम पूर्ण करणार्‍या 1,76,113 विद्यार्थ्यांपैकी 20 वर्षापेक्षा कमी वयोगटांतील 740, 20 ते 39 वयोगटांतील 1,55,688, 40 ते 59 वयोगटांतील 19,493 तर 60 पेक्षा अधिक वर्षे वय असणारे 192 विद्यार्थी होते.

छत्रपती शिवाजी, शाहू महाराज अध्यासनाची आवश्यकता
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्यासारख्या महापुरुषांच्या नावाने अध्यासने सुरू करावीत. दोन्ही महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांसह समाजात पोहोचविण्याचे, रुजवण्याचे कार्य या अध्यासनांच्या माध्यमातून करावे. या महापुरुषांचे चरित्र कायम जनतेसमोर असले पाहिजे, असे प्रतिपादन
ना. उदय सामंत यांनी केले.

सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी
संदीप साहेबराव धोरण (कुलपती), भाऊसाहेब रावसाहेब आंबुलकर, रोशनी अनुप हरगुनाणी, दानेश बेहराम मिस्त्री, करिश्मा दिलीप गवळी, अतुल दत्तात्रय भांदिर्गे (यशवंतराव चव्हाण), अजय सदानंद कोंडेकर (ब्ल्यू बर्ड), उषा ज्ञानेश्वर काटकर (सावित्रीबाई फुले पारितोषिक) आदी.

हेही वाचा :

Back to top button