सोयाबीन, भुईमुगाला प्राधान्य ठरेल फायद्याचे | पुढारी

सोयाबीन, भुईमुगाला प्राधान्य ठरेल फायद्याचे

सांगली; विवेक दाभोळे : वैशाख वणवा दाहक होत असतानाच आता शेतकरीवर्ग शिवारात खरिपाच्या तयारीस लागला आहे. यावेळी सोयाबीन, भुईमुगाला प्राधान्य देऊन शेतकरी वर्गाने बाजारातील दरतेजीचा लाभ उठविण्याची गरज आहे. तेलबियांच्या लागवडीतून फायदा तर हमखास होईलच शिवाय बाजारातील खाद्यतेलाचे दर सामान्य माणसाच्या आवाक्यात राहू शकतील.

शेती, शेतकर्‍यासाठी खरीप हंगामाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यावेळी प्रथमच उन्हाळी पाऊस अत्यंत समाधानकारक झाले आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला आहे. उन्हाळी मशागतीची कामे शिवारात वेगाने होत आहेत. यावेळी प्रथमच जिल्ह्यात सोयाबीन तसेच भुईमूग या तेलबिया पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

सोयाबीनच तारेल शेतकर्‍याला सोयाबीनला गेल्या हंगामात आजपर्यंतचा सर्वाधिक म्हणजे तब्बल 10 हजार रुपयांहून अधिक प्रतिक्विंटल दर मिळाला. तोपर्यंत सातत्याने पडत्या दराचा सामना करत असलेले सोयाबीन पीक उच्चांकी दरामुळे चर्चेत आले आहे. या पिकाचे शेतकरीवर्गात मोठे आकर्षण राहिले आहे.

सांगली जिल्ह्यात तब्बल 75 टक्केहून अधिक शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. या गटातील शेतकरी तातडीचा खर्च करण्यासाठी हुकमी पैसा देणारे पीक या नजरेनेच सोयाबीनकडे पाहतो. खरीप सोयाबीन काढणीनंतर त्याला लगेचच ऊसलागवडीचा बियाणे, खते हा खर्च असतो. यामुळे काढणी, मळणीनंतर सोयाबीन विक्री करून त्याला ताजा पैसा हातात येतो. ऑक्टोबर ते डिसेंबर हा सोयाबीन काढणीचा हंगाम ठरतो. डिसेंबरअखेरपर्यंत बहुतेक सर्वच शेतकरी सोयाबीन विक्री करतात. सोयाबीन हमीभाव रु. (हंगामनिहाय) पुढीलप्रमाणे:
सन 2018 – 2019 : 3399,
सन 2019 – 2020 : 3710,
सन 2020 – 2021: 3880,
सन 2021 – 2022 : 3950.

सरकारने सातत्याने हमीभाव वाढवला आहे मात्र हमीभावापेक्षा जादा दराची हमी केवळ सोयाबीन आणि भुईमूग या पिकातच राहिली आहे. जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, मिरज, कडेगाव या तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्र हे सातत्याने सोयाबीनखाली राहिले आहे.
सोयाबीनचा एकरी किमान 14 ते15 क्विंटल उतारा मिळतो. 22/23 हजार रुपये खर्च वजा जाता किमान 6 हजाराचा दर मिळाला तरी एकरी 75 ते 80 हजाराचे आरामात उत्पन्न निघते. माञ यासाठी काढणी, मळणी यासाठी कमालीची वेगवान यंत्रणा राबवावी लागते. गेल्या वर्षी अनेक सोयाबीन उत्पादकांना याचा लाभ झाला आहे.

भुईमूगदेखील फायद्याचेच गेल्या काही हंगामातील आकडेवारी पाहिली असता, भुईमूग पिकांच्या क्षेत्रात घट झाली असल्याचे दिसते. मात्र जरी भुईमूग पिकांच्या उत्पादनात घट आली तरी आलेल्या जेमतेम पिकांलादेखील चांगला मोबदला मिळाला आहे असेच दिसते. खाद्य तेलाचे दर आटोक्यात आणण्यासाठी तेलबियांच्या लागवडीतून फायदा होणार याची खुणगाठ शेतकरी वर्गाने बांधण्याची गरज असल्याची जाणकारांची प्रतिक्रिया आहे.

Back to top button