टर्म इन्शुरन्स आणि वय | पुढारी

टर्म इन्शुरन्स आणि वय

मृदुला फडके

टर्म इन्शुरन्सवरून अनेक प्रकारचे समज-गैरसमज आहेत. काहींच्या मते, वयाची 40 किंवा 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर टर्म इन्शुरन्स घेणे फायद्याचे नाही. कारण, काही कंपन्या या वयोगटातील व्यक्तीला प्लॅन देत नाही. परंतु, ही सर्व चुकीची माहिती आहे.

टर्म प्लॅन योजना ही 18 ते 65 वयोगदरम्यान कधीही खरेदी करता येऊ शकते आणि त्यास कमाल 99 वर्षांपर्यंत कवच मिळते. यात फरक असतो तो हप्त्याचा. म्हणूनच टर्म इन्शुरन्स कोणत्या काळात खरेदी करणे फायद्याचे राहील, हे इथे सांगता येईल.

एखादा तरुण जेव्हा आपले शिक्षण पूर्ण करून नोकरी किंवा व्यवसाय सुरू करतो, तेव्हा त्याच्या आशा-स्वप्नांना पंख फुटलेले असतात. हाती पैसा येताच वायफळ खर्च वाढतो. नोकरी मिळाल्यानंतर काही वर्षांनी त्याचे पालक दोनाचे चार हात करतात. विवाहानंतर त्याच्यासोबत पत्नीचेही आयुष्य जोडले जाते. एखादी दुर्दैवी घटना घडली, तर पत्नीचे, मुलांचे काय होईल, असा विचार त्याच्या मनात येतो. मग, तो कुटुंबाच्या भविष्यावरून नवनवीन योजना तयार करतो.

अशावेळी एखादा व्यक्ती चांगले आर्थिक नियोजन करत असेल आणि कमी वयात नोकरी मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काळात टर्म इन्शुरन्स घेत असेल, तर त्याच्या पश्चात मुलांचे शिक्षण, विवाह, दवाखाना, दररोजचे खर्च आरामात करता येतात आणि सर्व चिंतांपासून मुक्ती मिळू शकते. एखादा व्यक्ती वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर योजना घेऊ शकतो काय, असा प्रश्न पडू शकतो. याबाबत जाणून घेऊ.

वयोमर्यादा किती?

टर्म इन्शुरन्स पॉलिसी वयाच्या 18 ते 65 दरम्यान कधीही खरेदी करू शकतो. 50 ते 65 वर्षांपर्यंत कोणत्याही व्यक्तीला या योजनेनुसार 99 वर्षांपर्यंत कव्हर मिळू शकते. प्रत्येक व्यक्तीची वयानुसार गरज बदलत असते. त्यामुळे वेगवेगळ्या वयागेटात टर्म इन्शुरन्सची खरेदी कशी करता येईल, यावर विचार करावा.

कोणत्या वयात कोणती योजना?

एखाद्याचे वय वीस ते तीसदरम्यान असेल, तर या काळात शिक्षण पूर्ण करून नोकरी किंवा व्यवसायाकडे वाटचाल होते. अशा स्थितीत काही जणांवर शैक्षणिक कर्जही असते आणि कुटुंबाची जबाबदारीही. सुरुवातीच्या काळात वेतन कमी असते. या काळात टर्म इन्शुरन्स घेणे फायद्याचे राहू शकते. तरुणपणी आजारपण फारसे उद्भवत नसल्याने विमा कंपन्या त्यांच्याकडून कमी हप्ता घेतात. दुर्दैवाने एखादी घटना घडली, तर त्यांच्या कुटुंबाला शैक्षणिक कर्ज किंवा अन्य खर्च कमी करण्यात कोणतीही अडचण येत नाही. ही गोष्ट टर्म इन्शुरन्सने साध्य होऊ शकते.

एखादा व्यक्ती 20 ते 30 वयोगटात असताना टर्म प्लॅन घेऊ शकत नसेल, तर तिच्यासमोर आर्थिक अडचणी येऊ लागतात. साधारणपणे 30 ते 35 किंवा 40 व्या वर्षी विवाह होतो. मोटार खरेदी, घर खरेदी होते. अशावेळी त्यांचा खर्च वाढणे साहजिकच आहे. गेल्या दहा वर्षांत त्याचे वेतन वाढलेले असते; परंतु खर्चही त्याच प्रमाणात वाढलेले असते. अशावेळी या वयोगटातील टर्म प्लॅनचा हप्ता हा अधिक असतो. तो हप्ता भरणे कठीण जाते.

एखादा व्यक्ती 40 ते 50 वयोगटात टर्म प्लॅन खरेदी करत असेल, तर त्याचा हप्ता अधिक असतो. एकीकडे महागडा हप्ता आणि दुसरीकडे वाढत्या वयाबरोबर जबाबदारी देखील वाढलेली असते. या वयोगटात मुलांच्या शिक्षणासाठी आणि उच्च शिक्षणासाठी अधिक रक्कमेची गरज असते. मुलीचा विवाह करायचा असतो. एखाद्याने घर खरेदी केले असेल, तर त्याच्या हप्त्याचा बोजा असतो. अशोवळी टर्म इन्शुरन्सचा अधिक हप्ता भरणे शक्य नसते.

50 ते 65 वयोगटातील व्यक्तींना टर्म इन्शुरन्स देण्याबाबत कंपन्या फारशी टाळाटाळ करत नाहीत; मात्र या वयोगटातील हप्ता हा कल्पनेपलीकडे राहू शकतो. कारण, या वयोगटात शरीराची वाटचाल ही वृद्धावस्थेकडे होत असते. त्यामुळे अधिक मेहनत करून उत्पन्न वाढण्याबाबत शरीर साथ देत नाही. वयपरत्वे आजारपण येऊ लागते. अशावेळी विमा कंपन्या सर्व गोेष्टींचे आकलन करून हप्ता अधिक ठेवतात. अर्थात, टर्म प्लॅन हा सर्वात स्वस्त प्लॅन असल्याने कोणतीच व्यक्ती हप्ता भरू शकणार नाही, असे नाही.

अधिक वयात रायडर घ्या

एखाद्या व्यक्तीने 50 पेक्षा अधिक वय ओलांडलेले असेल आणि तो टर्म प्लॅन घेत असेल, तर त्याने टर्म प्लॅनबरोबर क्रिटिकल इलनेसचे कवचही घ्यावे. त्यामुळे आरोग्यासंबंधीच्या समस्या उद्भवल्यास रुग्णालयात दाखल होण्यापासून घरी येण्यापर्यंत सर्व खर्चांना विमा कवच मिळते. टर्म प्लॅनमध्ये अनेक प्रकारचे रायडर आहेत. अर्थात, रायडर घेतल्यानंतर हप्ता वाढतो. एकूणात टर्म प्लॅन योजना वयाच्या 65 वर्षापर्यंत घेता येते. हप्त्यात मात्र फरक राहू शकतो. म्हणून नोकरी किंवा व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात टर्म प्लॅन खरेदी करणे हिताचे ठरू शकते.

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?

टर्म इन्शुरन्स ही एक विमा योजना आहे. ती विमाधारकाला नाही, तर त्याच्या कुटुंबाचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करते. टर्म इन्शुरन्स हे अन्य विमा योजनेच्या तुलनेत स्वस्त आहे. परंतु, विमाधारकाला याचा प्रत्यक्षात लाभ हा तरुण वयातच म्हणजेच 20 ते 25 वयोगटातच मिळू शकतो. याच काळात योजना खरेदी करणे अपेक्षित आहे. तरुण वयात विम्याचा हप्ता खूपच कमी असतो. परंतु, जसजसे वय वाढत जाईल, तसतसा हप्ताही वाढत जातो.

Back to top button