पाक निवडणूक निकाल:  56 तासांची मतमोजणी पूर्ण; अशी आहेत सत्तेची समीकरणे | पुढारी

पाक निवडणूक निकाल:  56 तासांची मतमोजणी पूर्ण; अशी आहेत सत्तेची समीकरणे

इस्लामाबाद: पुढारी ऑनलाईन

पाकिस्तान निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकांचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय)पक्षाने संसदेच्या 270 पैकी सर्वाधिक 116 जागांवर विजय मिळवला आहे. पण सरकार स्थापन करण्यासाठी इम्रान खान यांना अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.  

निवडणूक  आयोगाने तब्बल 56 तासांच्या मतमोजणीनंतर 11व्या सार्वत्रिक निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर केला. यात सत्तधारी नवाझ शरिफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग(नवाझ) यांना केवळ 64 जागा तर माजी राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांच्या पाकिस्तान पिपल्स पार्टी पक्षाला 43 जागा मिळाल्या आहेत. 

इम्रान खान पंतप्रधान; कशी आहेत सत्तेची समीकरणे

पाकिस्तानच्या संसदेत साधे बहुमत मिळवण्यासाठी इम्रान खान यांना किमान 137 जागांचा गरज आहे. सरकार स्थापन करण्यासाठी ‘पीटीआय’ला 22 जागांची गरज आहे. यासाठी त्यांना अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांची मदत घ्यावी लागेल. निवडणुकीत अपक्षांनी 13 जागांवर विजय मिळवला आहे. तर एमएमएने 12 जागांवर विजय मिळवला आहे. त्याशिवाय एमक्यूएम-पी 6 ठिकाणी, बलुचिस्तान अवामी पार्टी 4 ठिकाणी, पीएमएल-क्यू  4 ठिकणी व  ग्रॅन्ड डेमोक्रॉटिक अलायन्स  2 ठिकाणी विजय मिळाला आहे. 

पीटीआयला सरकार स्थापन करण्यासाठी छोट्या पक्षांसोबत अपक्षांवर देखील अवलंबून रहावे लागणार आहे. तसेच सत्ता स्थापन करण्यात अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 

प्रांताचा विचार केल्यास पंजाबमध्ये पीएनएल-एन पक्षाला सर्वाधिक 129 जागा मिळाल्या आहेत. सिंधमध्ये पीपीपीला सर्वाधिक 76  व खैबरपक्तुनमध्ये पीटीआयला 66 जागा मिळाल्या आहेत. तर बलुचिस्तानमध्ये बीएपीला सर्वाधिक 15 जागा मिळाल्या आहेत.  

दरम्यान, इम्रान खान 14 ऑगस्टच्या आधी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची माहिती पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी दिली आहे. 

‘पीटीआय’ला जागा सोडाव्या लागतील

इम्रान खानसह ‘पीटीआय’चे अनेक नेते असे आहेत ज्यांनी एकापेक्षा जास्त ठिकाणी विजय मिळवला आहे. पाकमधील नियमानुसार एकच जागा स्वत:कडे ठेवता येते. त्यामुळे पीटीआयच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. खुद्द इम्रान खान पाच मतदारसंघातून निवडूण आले आहेत. त्यामुळे त्यांना चार ठिकाणी राजीनामा द्यावा लागेल. 

अमेरिकेची संमिश्र प्रतिक्रिया 

दक्षिण आशियाची भरभराट व स्थिरता तसेच सुरक्षा यासाठी पाकिस्तानातील नवीन सरकारबरोबर काम करण्याची अमेरिकेची तयारी असल्याचे  परराष्ट्र खात्याने म्हटले आहे. त्याबरोबरच पाकिस्तानात मतदान आणि मतमोेजणी ज्या पद्धतीने झाली ते पाहता निवडणूक निःपक्षपातीपणे झाली, असे म्हणणे धाडसाचे ठरेल, अशी नकारात्मक प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. निवडणुकीच्या वेळी प्रसारमाध्यमांची झालेली मुस्कटदाबी व अभिव्यक्तीष स्वातंत्र्यात आलेले अडथळे याची आम्हाला चिंता वाटते, असे त्यांनी म्हटले आहे. 

संशयास्पद निकाल:शरीफ

पाकिस्तानातील निवडणुकीत गैरप्रकार झाले आहेत. प्रदीर्घकाळ चाललेली मतमोजणीही संशयास्पद आहे. त्यामुळे त्याचे देशावर खूप वाईट परिणाम होतील, असे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सांगितले. शरीफ हे सध्या तुरुंगात आहेत. निकालावर त्यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली. निवडणुकीत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या पक्षाची सरशी झाल्यानंतर प्रथमच त्यांनी प्रतिक्रिया दिली. शरीफ यांना त्यांच्या कन्या व जावयासह लंडनमधील चार आलिशान फ्लॅटप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.

चीन, इराण खास मित्र : इम्रान खान

पाकिस्तानचे भारताबरोबर चांगले संबंध असले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया व्यक्ता करतानाच इम्रान खान यांनी चीन, इराण, सौदी अरेबिया हे पाकिस्तानचे खास मित्र असतील, असे पत्रकार परिषदेत सांगितले. अमेरिकेसमवेत चांगले संबंध असण्याची पाकिस्तानला आशा आहे. मात्र, हे संबंध एकतर्फी असतील, तर त्याला काहीच अर्थ नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Back to top button