जीवन विमा की टर्म इन्शुरन्स? | पुढारी

जीवन विमा की टर्म इन्शुरन्स?

अभिलाषा चांदोरकर

टर्म इन्शुरन्स योजना ही जीवन विमा पॉलिसीपेक्षा उत्तम आणि परवडणारे साधन आहे. अन्य विमा योजनांच्या तुलनेत टर्म पॉलिसी स्वस्त आहे. कारण या योजना विमा आणि गुंतवणूक यांच्यात सरमिसळ करत नाही. मात्र हप्त्यावर परतावा मिळत नसल्याने बहुतांश नागरिक या अशा प्रकारच्या पॉलिसीकडे पाठ फिरवतात. यानुसार आज अनेक विमा कंपन्यांनी  हप्ता परत करणारी टर्म प्लॅन (रिटर्न ऑफ प्रीमियम) म्हणजेच आरओपी सादर केली आहे. यानुसार पॉलिसी परिपक्व झाल्यानंतर हप्त्याची रक्‍कम परत विमाधारकाला दिली जाते. अशा स्थितीत पॉलिसीची निवड करण्यावरून ग्राहकाची द्विधा मन:स्थिती होऊ शकते. साधारण टर्म पॉलिसी घ्यावी की हप्ता परत करणारी पॉलिसी घ्यावी यामध्ये आपण गोंधळतो. मात्र अर्थतज्ज्ञांच्या मते, साधारण टर्म प्लॅन हा फायदेशीर ठरू शकतो. 

गुंतवणूक आणि विमा वेगळे ठेवा : टर्म प्लॅन हे काय गुंतवणुकीचे साधन नाही. ही एकप्रकारची शुद्ध स्वरूपातील विमा योजना आहे. यासाठी जर टर्म प्लॅन खरेदी करायचा असेल तर केवळ टर्म प्लॅनच खरेदी करा. हप्ता परत करणार्‍या प्लॅनच्या प्रेमात पडू नका.

अनेक पटीने हप्ता : जर आपण साधारण टर्म पॉलिसी न घेता आरओपी पॉलिसी घेत असाल तर आपल्याला विम्याच्या कालावधीदरम्यान अनेक पटीने हप्ता भरावा लागतो. जर एखादा 35 वर्षांचा व्यक्‍ती एक कोटी रुपयाचा साधारण टर्म प्लॅन 20 वर्षांसाठी घेत असेल तर त्याला 9 हजार रुपयांचा हप्ता भरावा लागेल. मात्र त्याने आरओपी योजना घेतली तर त्याला 30 हजारांपर्यंत हप्ता भरावा लागेल. वयाच्या 18 व्या वर्षापासून वयाच्या 65 पर्यंत टर्म प्लॅन खरेदी करू शकता. टर्म इन्शुरन्स पॉलिसी ही किमान पाच वर्षांसाठी खरेदी करू शकतो. टर्म प्लॅनमध्ये विमा कवच हे आपल्या उत्पन्नाच्या दहा पट अधिक असायला हवे. 

विमा कालावधी कमी : आरओपी प्लॅनमध्ये विमा कवचचा कालावधी हा साधारण टर्म प्लॅनच्या तुलनेत कमी असतो. साधारण टर्म प्लॅनमध्ये कंपन्या 40 ते 45 वर्षांचे कवच देते. त्याचवेळी आरओपी प्लॅनमध्ये हा कालावधी 20 ते 25 वर्षांचा राहतो. 

कोणता पर्याय चांगला : अर्थतज्ज्ञांच्या मते, आरओपीच्या ऐवजी साधारण टर्म पॉलिसी घेणे फायदेशीर ठरू शकते. साधारण टर्म पॉलिसीत कमी हप्ता भरून उर्वरित रक्‍कम ही पीपीएफ, एसआयपी, रिकरिंग, मुदत ठेवी यात ठेवून चांगला परतावा मिळवू शकतो.

अधिक शुल्क आकारणी : आरओपी प्लॅनमध्ये कंपन्या हप्ता परत करण्यासाठी देखील शुल्काची आकारणी करतात. त्याचवेळी साधारण टर्म पॉलिसीमध्ये अशा प्रकारचे कोणतेही शुल्क आकारले जात नाही. 

ऑनलाईन विमा खरेदी : विमा एंजटच्या तुलनेत ऑनलाईन टर्म प्लॅन खरेदी करणे हे फायदेशीर आहे. कारण ऑफलाईनच्या तुलनेत ऑनलाईन टर्म प्लॅन खरेदी करणे 25 टक्क्यांपर्यत स्वस्त असू शकते. आपण संबंधिक कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन विमा पॉलिसी खरेदी करू शकतो. याप्रमाणे आपण मोठी रक्‍कम बर्‍यापैकी वाचवू शकतो आणि हप्ताही कमी बसतो. 

 

Back to top button