ताडोबात पाण्याच्या शोधात ४ अस्‍वलांचा विहिरीत पडून मृत्‍यू  | पुढारी

ताडोबात पाण्याच्या शोधात ४ अस्‍वलांचा विहिरीत पडून मृत्‍यू 

चंद्रपूर : प्रतिनिधी 

उन्हाळ्याच्या भीषण तापमानात वन्यप्राणी मानवी वस्तींकडे पाण्याच्या शोधात येतात, मात्र कधीकधी ही तहान त्यांच्या जिवावर बेतून जाते. पाण्याच्या शोधात असलेल्या चार अस्वलांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना चंद्रपुरातील जगप्रसिद्ध ताडोबा जंगलातील बफर झोन क्षेत्रात घडली आहे.

दोन मोठ्या अस्वलींसह त्यांची दोन पिल्ल कठडे नसलेल्या विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याची घटना उघड झाली आहे. ताडोबा अभयारण्यातील बफर झोनलगत असलेल्या वढोली येथील शेतात विहीर आहे. काल रात्रीच्या सुमारास दोन मोठे आणि दोन अस्वलाची पिले हे कुटुंब पाण्याच्या शोधात असताना या विहिरीत पडले. आज (गुरुवारी) सकाळी शेतात काही लोक गेले असताना त्यांना विहिरीतील पाण्यात अस्वलांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले.  

अधिक वाचा : १८ वर्षांवरील लोकांना लस कोठून द्यायची?

सध्या चंद्रपुरात 41 ते 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद दिवसाआड होत आहे. वाढवेल्या तापमानामुळे प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ताडोबातून वन्यप्राणी पाण्यासाठी जंगलातून बाहेर पडत आहेत. अशी परिस्थिती दरवर्षी उद्भवत असते. काल रात्री चार अस्वल पाण्याच्या शोधात फिरत असताना शेतातील विहिरीत पडले. कठडे नसल्यामुळे ते सर्व अस्वल विहीरीत एकापाठोपाठ पडली. विहीरीत पाणी असल्याने त्यांना जास्त वेळ पाण्यात तरंगता आले नाही. परिणामी त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. वनविभागाचे एक वनपथक घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

पट्टेदार वाघ, बिबटे, काळा बिबट्या व विविध प्राण्यांसाठी ताडोबा अभयारण्य प्रसिद्ध आहे. ताडोबात पर्यटकांना पट्टेदार वाघाचे हमखास होणारे दर्शन हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे. तसेच विविध प्रकारचे वन्य प्राणी पर्यटकांना दर्शन देऊन भुरळ घालतात. वाघांसोबतच ताडोबात अस्वल पर्यटकांना पहायला मिळतात. मात्र दुर्मिळ स्वरुपात असणाऱ्या चार अस्वलांचा ताडोबातील बफर झोन मध्ये विहिरीत पडून मृत्यू झाल्याने वन्यप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. ताडोबा अभयारण्यात येणाऱ्या विविध झोनमध्ये शेतशिवारातील विहिरींना कठडे नाहीत त्यामुळे अनावधानाने वन्यप्राण्यांची नजर चुकली तर त्यांना थेट विहिरीत पडावे लागते. परिणामत: त्यांचा जीव गेल्याशिवाय गत्यंतर नसते. काही दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघिणीचा एक शावक सुशी दाबगाव शेतशिवारात अशाच प्रकारे विहिरीत पडला होता. मात्र वनविभागाचे रेस्क्यू पथकाने त्याला बाहेर काढून त्याला जीवदान दिले. ताडोबा प्रशासनाने कटडे नसणाऱ्या विहिरींना सुरक्षित करावे अशी मागणी वन्यप्रेमींकडून करण्यात आली आहे. 

Back to top button