‘सरल’झाली पॉलिसी खरेदी | पुढारी | पुढारी

‘सरल’झाली पॉलिसी खरेदी | पुढारी

विनिता शाह

पॉलिसी खरेदी करणारा कोणताही ग्राहक हा सुरुवातीला नियम आणि अटी पाहून संभ्रमात राहतो. एकाच प्रकारच्या पॉलिसीचे कंपनीनिहाय नियम आणि अटी मात्र वेगवेगळ्या असतात. याशिवाय कंपनीकडून दिल्या जाणार्‍या अर्जाची भाषा देखील किचकट असते. त्यामुळे सामान्य ग्राहकांना ती भाषा लवकर समजत नाही आणि कोठे काय नमूद करायचे, हेदेखील चटकन कळत नाही. ग्राहकांच्या या अडचणी लक्षात घेऊन इर्डा या विमा नियामक संस्थेने काही महत्त्वाचे बदल केले आहेत. या सर्वात मोठा बदल म्हणजे अनेक प्रकारच्या विमा पॉलिसीसाठी किमान एकच निकष, मानकं ठेवण्याचे निर्देश कंपन्यांना दिले आहेत. यात म्हटले की, विमा कंपन्यांना प्रत्येक प्रकारच्या पॉलिसीसाठी एकाच मानकांवर आधारित पॉलिसी बाजारात आणणे गरजेचे आहे. त्यास ‘सरल’ या नावाने ओळखता येईल.

या प्रकारच्या पॉलिसीत दुर्घटना विमा, टर्म इन्श्युरन्स, प्रवास विमा यासह अनेक प्रकारच्या विमा पॉलिसीचा समावेश असेल. यानुसार विमा कंपन्यांनी ‘सरल जीवन विमा टर्म प्लॅन’ बाजारात आणला आहे. याशिवाय आरोग्य आणि व्यक्तिगत दुर्घटना विम्याशी निगडित सरल पॉलिसीदेखील बाजारात येत आहे. 

मानकांवर आधारित पॉलिसीची गरज कशामुळे?

स्टँडर्ड अथवा मानक विमा पॉलिसीची आवश्यकता बर्‍याच काळापासून व्यक्त केली जात होती. विमा खरेदी करणार्‍या व्यक्तींची एकच कायम तक्रार असायची, ती म्हणजे वेगवेगळ्या विमा कंपन्या एकाच प्रकारच्या योजनेसाठी वेगवेगळा हप्ता आकारतात. त्यांचे नियम आणि अटी वेगवेगळ्या असतात. त्याची भाषादेखील लवकर समजत नाही. त्यामुळे इर्डा संस्थेने या समस्येचे आकलन केले आणि या त्रुटी दूर कराव्यात, असे मत मांडले. 

सरल पर्सनल अ‍ॅक्सिडेंट पॉलिसी

विमा नियामक संस्थेच्या निर्देशानुसार विमा कंपन्या एक एप्रिलपासून सरल व्यक्तिगत अपघात विमा लाँच केल्या आहेत. या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व कंपन्यांना एकाच प्रकारचे नियम आणि अटी लागू करून पॉलिसी लाँच करावी लागणार आहे. यशिवाय या पॉलिसीत अडीच लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतचा विमा कवच घेता येणार आहे. पॉलिसीची भाषादेखील सोपी आणि सुटसुटीत असेल आणि त्याची रचना सारखीच असेल. त्याचबरोबर 18 ते 70 वयोगटातील लोकांना अशा प्रकारची पॉलिसी घेता येईल. 

यात काय असेल?

सरल व्यक्तिगत अपघात विमा पॉलिसीत सध्याच्या पॉलिसीप्रमाणे सर्व प्रकारचे कवच असेल. कोणत्याही दुर्घटनेत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारास विम्याच्या रकमेवर दावा करता येणार आहे. दाव्याचा कालावधी हा एक वर्षाच्या आत असणे गरजेचे आहे. अपंगत्व आणि गंभीर दुखणे झाल्यास विमा कंपन्या आंशिक भरपाई देऊ शकतील. याशिवाय सरल व्यक्तिगत विम्यानुसार एखाद्या विमाधारकाला कायमचे अपंगत्व आले किंवा त्याच्या उत्पन्नावर परिणाम होत असेल तर विमा कंपनी त्याला कवच प्रदान करेल. हे कवच दर महिन्याला सम अ‍ॅश्युर्ड रकमेच्या 0.2 टक्के इतके असेल. जोपर्यंत पॉलिसीधारक दुरुस्त होत नाही तोपर्यंत कंपनीला आर्थिक भार उचलावा लागेल. सरल पॉलिसीत अपघातामुळे पॉलिसीधारक दवाखान्यात दाखल होत असेल, तर त्याचा खर्चदेखील कंपनी देईल. यानुसार बेसिक सम अ‍ॅश्युर्डच्या दहा टक्क्यांपर्यंत भरपाई मिळू शकते. यासाठी काही नियम आणि अटी लागू असतील. 

चांगल्या सेवा देणार्‍या कंपन्यांची निवड 

विमा नियामकच्या निर्देशानुसार विमा कंपन्या विम्याची रक्कम स्वत:च प्रदान करेल. मात्र सर्व कंपन्यांच्या सरल योजना सारख्याच असणे अपेक्षित आहेत. सर्व कंपन्यांच्या पॉलिसीत विमा कवच, हप्ता, नियम, अटी सारख्याच असतील तर ग्राहक सोयीनुसार विमा कंपनीची निवड करेल. साहजिकच चांगली सेवा प्रदान करणार्‍या कंपनीबाबत ग्राहक सकारात्मक असेल. समान अटी आणि नियम लागू करण्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे विमा कंपन्या या पॉलिसी प्रदान केल्यानंतर ग्राहकांना अपेक्षित प्रतिसाद देत नाहीत. आता चेंडू ग्राहकांच्या कोर्टात आहे. शेवटी चांगली सेवा देणार्‍या कंपनीचीच निवड ग्राहक करेल, हे निश्चित. 

 

Back to top button