पुणे : आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा पुन्हा हल्ला, १७ वर्षाचा मुलगा जखमी | पुढारी

पुणे : आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा पुन्हा हल्ला, १७ वर्षाचा मुलगा जखमी

पारगाव : पुढारी वृत्तसेवा

खेड तालुक्यात दोन ठिकाणी महिलांवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला आहे. ही घटना ताजी असतानाच बुधवारी पहाटे आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील डोंगरमळ्यात बाजरी पिकाला पाणी देणाऱ्या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये ओंकार दिलीप टेमगिरे (वय १७) हा तरुण जखमी झाला आहे .

मंचर ते बेल्हे रस्त्यावर थोरांदळे गावाच्या अलीकडे डोंगरमळा आहे. येथील तरुण ओंकार दिलीप टेमगिरे हा बुधवारी (दि ११) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बाजरी पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता. त्यावेळी बारे सुरू करण्यासाठी तो वाकला असता बाजरी पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याने ओंकार टेमगिरे घाबरला. त्याने आरडाओरडा केला. त्यावेळी शेजारी असलेले योगेश पोपट टेमगिरे तेथे धावत आले. तोपर्यंत बिबट्याने तेथून उसाच्या शेतात धूम ठोकली होती. आरडाओरडा केल्याने ओंकारचा जीव वाचला.

योगेश टेमगिरे यांनी वनविभागाला ही माहिती दिली. वनरक्षक पी. के. पवार, महेश टेमगिरे, योगेश टेमगिरे यांनी जखमी ओंकार टेमगिरे याला मंचर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. ओंकारच्या कपाळाला, हाताला व पायाला जखमा झाल्या आहेत.

या घटनेमुळे थोरांदळे, डोंगरमळा परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान डोंगरमळा परिसरातील शेतकऱ्यांनी एकट्याने फिरू नये. सावधगिरी बाळगावी. रात्रीच्या वेळी घरातच थांबावे, असे आवाहन वनरक्षक पी. के. पवार यांनी केले आहे.

 

Back to top button