सांगली : ‘नगरसेवक अपात्रता’ : १७ मे रोजी सुनावणी | पुढारी

सांगली : ‘नगरसेवक अपात्रता’ : १७ मे रोजी सुनावणी

सांगली : पुढारी वृत्तसेवा महापौर, उपमहापौर निवडणुकीत पक्षीय आदेश डावलून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना मतदान करणार्‍या 5 नगरसेवकांविरोधात भाजपने दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर दि. 17 मे रोजी पुणे विभागीय आयुक्त यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. रखडलेल्या या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये झालेल्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक फुटल्याने बहुमतातील भाजपचा नामुष्कीजनक पराभव झाला होता. भाजपच्या स्नेहल सावंत, महेंद्र सावंत, नसीमा नाईक, अपर्णा कदम यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले होते. तर शिवाजी दुर्वे व आनंदा देवमाने यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नव्हता. परिणामी बहुमत असूनही भाजपला महापौर, उपमहापौर निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.

भाजपने हा प्रकार गांभीर्याने घेत फुटीर नगरसेवकावर कारवाईचा निर्णय घेतला. भाजप गटनेते विनायक सिंहासने यांनी फुटीर सदस्यांच्या अपात्रतेसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे अर्ज सादर केला होता.

दरम्यान, समाजकल्याण समिती सभापती निवडणुकीत मदत केल्याने आनंदा देवमाने यांच्याविरोधातील अपात्रतेचा प्रस्ताव भाजपने मागे घेतला. उर्वरित 5 नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी दाखल केलेल्या अर्जावर दि. 17 मे रोजी सकाळी 11 वाजता पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी होणार आहे. कोरोना व काही तांत्रिक कारणामुळे सुनावणी अनेकदा पुढे ढकलण्यात आली होती.

दरम्यान पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाचे उपायुक्त दत्तात्रय लांघी यांनी संबंधित सदस्य, भाजप गटनेते, महापालिका प्रशासन यांना सुनावणीसाठी नोटीस बजावली आहे. सुनावणी वेळी पुराव्याच्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे नोटिसमध्ये म्हटले आहे.

Back to top button