GT vs MI : मुंबईचा गुजरातला हादरा | पुढारी

GT vs MI : मुंबईचा गुजरातला हादरा

पुढारी ऑनलाईन डेस्क :  वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी फटकावलेली शानदार अर्धशतके अखेर निष्फळ ठरली आणि मुंबई इंडियन्सने बलाढ्य गुजरातवर शुक्रवारी 5 धावांनी सनसनाटी विजय संपादला. दहा लढती झाल्यानंतर मुंबईने दुसर्‍यांदा विजयाची चव चाखली आहे. अर्थात, या स्पर्धेतून त्यांचे आव्हान यापूर्वीच आटोपले आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि भरवशाचा राहुल तेवतिया हे दोघेही बिनीचे फलंदाज धावबाद झाले व तिथेच सामना मुंबईच्या बाजूने झुकला.

 

Image

गुजरातने 11 सामन्यांतून 8 विजय मिळवले असून आज त्यांना तिसरा पराभव स्वीकारावा लागला. अर्थात, तरीदेखील गुजरातचा प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित मानला जात आहे. कारण त्यांचे तब्बल सोळा गुण झाले आहेत. मुंबईने ठेवलेले 177 धावांचे लक्ष्य गुजरातला गाठता आले नाही. निर्धारित 20 षटकांत त्यांना 5 बाद 172 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यांचा सलामीवीर आणि यष्टिरक्षक वृद्धिमान साहा याने 40 चेंडूंत 55 धावा फटकावल्या. त्यात 6 चौकार 2 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. दुसरा सलामीवीर शुभमन गिल यालाही चांगला सूर सापडला आणि त्याने 52 धावांची सुरेख खेळी केली. त्यासाठी त्याने 36 चेंडू घेऊन अर्धा डझन चौकार ठोकले आणि दोनदा चेंडू प्रेक्षकांत भिरकावून दिला. भक्कम पायाभरणी झाल्यानंतरही गुजरातने आपल्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. साई सुदर्शनने झटपट 14 धावा जमवल्या. कर्णधार हार्दिक पंड्या 24 धावा करून धावबाद झाला. भरवशाचा राहुल तेवतिया हाही धावबाद झाला. त्यानंतर डेव्हिड मिलरने आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. तथापि, त्याच्या 19 धावा संघाला विजयी करू शकल्या नाहीत. मुंबईकडून मुरुगन अश्विनने 2 गडी बाद केले. तसेच कायरान पोलार्डने एक गडी टिपला. गुजरातचे दोघे फलंदाज धावबाद झाले.

 

Image

त्यापूर्वी गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मुंबईने 20 षटकांत 6 गडी गमावून 177 धावा केल्या. त्यांनी धडाक्यात सुरुवात केली. सलामीवीर ईशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी 74 धावांची खणखणीत सलामी दिली. दोघांचेही अर्धशतक हुकले. किशनने 29 चेंडूंचा सामना करताना 45 धावा कुटल्या. 5 चौकार आणि 1 षटकार हे त्याचे मुख्य फटके ठरले. त्याला अल्झारी जोसेफने राशिद खानकरवी झेलबाद केले. रोहित शर्मा बॅडपॅचमधून बाहेर येत चालल्याचे दिसू लागले आहे. त्याने 28 चेंडूंत 43 धावा फटकावताना 5 चौकार आणि दोन उत्तुंग षटकार खेचले. त्याला राशिद खानने पायचित पकडले. सूर्यकुमार यादव याला फार काळ तग धरता आला नाही. वैयक्तिक 13 धावांवर त्याने तंबूचा रस्ता धरला. त्याला प्रदीप सांगवानने बाद केले. पाठोपाठ कायरान पोलार्डचा त्रिफळा राशिद खानने उद्ध्वस्त केला. पोलार्ड सुरुवातीपासूनच राशिदला बिचकून खेळत होता.

 

Image

 

तिलक वर्माने 21 धावांची खेळी केली. हार्दिक पंड्याने केलेल्या थ्रोमुळे तो धावबाद झाला. ठराविक अंतराने चार गडी बाद होत गेल्यामुळे मुंबईच्या धावगतीला खीळ बसली. सुरुवातीच्या सहा षटकांपर्यंत त्यांनी 10 धावा प्रतिषटक अशी गती राखली होती. पंधरा षटकांचा खेळ संपला तेव्हा त्यांनी 4 बाद 120 धावा केल्या होत्या. टिम डेव्हिडने 44 धावांची वादळी खेळी करताना 2 चौकार आणि 4 षटकारांची बरसात केली. त्याने अवघ्या 21 चेंडूंचा सामना केला. त्याच्यामुळेच मुंबईला समाधानकारक धावसंख्या गाठता आली. डेव्हिड सॅम्स दोन चेंडू खेळून लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर उंच फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्याचा झेल सीमारेषेवर राशिद खानने छान टिपला. या सामन्यात राशिदने एकूण तीन झेल घेतले. गुजरातकडून राशिद खानने 2, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी एक मोहरा टिपला.

 

Image

Image

Back to top button