कुरिअरचा शॉर्टकट | पुढारी | पुढारी

कुरिअरचा शॉर्टकट | पुढारी

गौरव डोंगरे, कोल्हापूर

गावात आपला वट असावा, अशी बाबुरावची खूप इच्छा. मुलांच्या शिक्षणाचे कारण सांगून तो गावाबाहेर गेला. एका फ्लॅटमध्ये राहण्याची व्यवस्था केली. दिमतीला चारचाकीही होती. काही वर्षांपूर्वी जुन्या वाहनांची विक्री करणारा बाब्या आज सर्वत्र बाबुराव नावाने ओळखला जात होता. लक्ष्मीचा तर त्याच्यावर नेहमीच आशीर्वाद अशी लोकांमध्ये भावना होती. परंतु, गुन्हा कुठल्याही अंधारात घडला, तरी तो उजेडात येतोच. रात्रीच्या अंधारात मोठमोठ्या अपार्टमेंटमध्ये असणारी कुरिअर कार्यालये फोडणार्‍या बाब्याला जेव्हा पोलिसांनी बेड्या ठोकल्या मग एका पाठोपाठ एक अशा 14 गुन्ह्यांची उकल झाली. मूळचा सातार्‍यातील असणार्‍या या बाबुरावने कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, पुणे, रायगड येथील कुरिअरची कार्यालये फोडून पैसे मिळविण्याचा शॉर्टकट निवडला होता. 

बाबुरावला स्वत:चे घर चालवायचे होते. त्यातच त्याचा चैनीखोर स्वभाव; पण कष्टाची तयारी नाही. काम करून उदरनिर्वाह करण्याऐवजी त्याने थेट चोरीचा शॉर्टकट निवडला. त्यातही त्याने कुरिअर कंपन्यांची कार्यालये फोडण्याचा फंडा वापरला. एका पाठोपाठ एक असे त्याने कुरिअरच्या कार्यालयांत चोरीचे घाट घातले. सोबत भाच्याला घेऊन त्याने कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि पुण्यात कुरिअर कंपन्यांची कार्यालये फोडण्याचा धडाकाच लावला. कुरिअरची कार्यालये कमी वर्दळीच्या ठिकाणी असतात, याठिकाणी रोख रक्‍कम, किमती वस्तू मिळतात हे बाबुरावने हेरले होते. त्याच्या डोक्यात नेहमीच याच कार्यालयांचा विषय असायचा. त्याने आपल्या भाच्यालाही यामध्ये सोबत घेतले. 

जुनी वाहने विक्रीचा बनाव

बाबुरावने आपण जुनी वाहने विकत असल्याचा एक बनाव रचला होता. त्याने यापूर्वी काही वाहने विकली आहेत. त्याच्या ताब्यातील अलिशान मोटार त्यानेच पूर्वी एकाला विकली होती. विक्रीनंतर काही महिन्यांनी त्याच्याच दारातून त्याची चोरी केली. हीच मोटार तो गुन्ह्यांमध्ये वापरत होता. पोलिसांनी ही मोटार आता जप्त केली आहे. सातारा जिल्ह्यात बाबुरावविरोधात मोटारसायकल चोरी, घरफोडी असे 8 गुन्हे दाखल आहेत. यातील दुचाकीही त्याने कोणालातरी विकल्याचा पोलिसांना संशय असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

बाबुराव विवाहीत असून त्याला दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. तो चोरी केल्यानंतर वारंवार आपले राहण्याचे ठिकाण बदलत असे. कुटुंबाला सोबत घेऊन त्याने अनेकदा घरे बदलली आहेत. पण त्याच्या घरच्यांना त्याच्या या कृत्याची पुसटशीही कल्पना नव्हती. पैसे कमविण्याचा शॉर्टकट म्हणून त्याने कुरिअर कार्यालये फोडण्याचा हा मार्ग अवलंबला होता. 

गुन्हेगाराने तो कितीही लपविला, कितीही वर्षे लपविला तरी त्याचा उलगडा एक ना एक दिवस झाल्यावाचून राहत नाही. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या नजरेतून तो सुटला नाही. शहरातील एका कुरिअर कंपनीच्या चोरीत त्याने वापरलेल्या वाहनावरून त्याची ओळख पटविण्यात आली. अन् त्याचा पाठलाग सुरू करण्यात आला. 

अनेकवेळा चकवा देणारा बाबुराव अखेर कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागला. पुण्यातील नामांकीत कुरिअर कंपनीची पाच कार्यालये फोडून त्याने रोकड व वस्तू चोरल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. यासह सांगलीतील एक, सातारामधील तीन, रायगडमधील एक व रत्नागिरीत दोन अशी तब्बल 14 कुरिअर कार्यालये फोडून चोरी केल्याची कबुली त्याने दिली. त्यामुळे त्याची रवानगी तुरुंगात झाली.

 

Back to top button