ट्रम्प यांचा चीनला जाता जाता धक्‍का | पुढारी

ट्रम्प यांचा चीनला जाता जाता धक्‍का

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून पायउतार होण्यापूर्वी चीनला मोठा धक्‍का दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने चिनी कंपन्यांमधील अमेरिकेच्या गुंतवणुकीवर बंदी घातली असून, त्यामुळे 31 चिनी कंपन्यांचे शेअर्स खरेदी करता येणार नाहीत, असे याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.

ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेची गुंतवणूक संस्था, पेन्शन फंड आणि इतरांना शेअर्स खरेदी करता येणार नाहीत. बंदी घातलेल्या सर्व कंपन्या संरक्षण क्षेत्रांतील आहेत. ट्रम्प प्रशासनाने जारी केलेल्या या आदेशानुसार कोणत्याही प्रकारच्या चिनी सैन्याशी जोडल्या गेलेल्या या चिनी कंपन्यांमध्ये अमेरिका गुंतवणूक करणार नाही. त्यामुळे चीनला हा मोठा धक्‍का असणार आहे. 

विशेषतः चायना टेलिकॉम कॉर्पोरेशन लिमिटेड, चायना मोबाईल लिमिटेड आणि पाळत ठेवण्याचे उपकरण निर्माता असलेली कंपनी हाइक व्हिजन या कंपन्यांना सर्वाधिक फटका बसेल, असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. पुढील वर्षी 11 जानेवारीपासून हा आदेश लागू होणार आहे. त्यानंतर अमेरिकन गुंतवणूकदार सूचीबद्ध चिनी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करु शकणार नाहीत. अर्थात नवनियुक्‍त अध्यक्ष जो बायडेन या निर्णयाचा फेरविचार करणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Back to top button