अनिल देशमुखांना क्लिन चिट?; चांदिवाल आयोगाकडून २०१ पानी अहवाल सादर | पुढारी

अनिल देशमुखांना क्लिन चिट?; चांदिवाल आयोगाकडून २०१ पानी अहवाल सादर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे गंभीर आरोप केले. याची दखल घेत राज्य सरकारने या आरोपांची समांतर न्यायालयीन चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाची स्थापना केली होती.

या आयोगाने चौकशी केल्यानंतर सुमारे २०१ पानांचा अहवाल तयार करून ग्रुह मंत्र्यांकडे सुपूर्द केला. गृह मंत्र्यांनी तो राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे.

या प्रकरणी उच्च न्यायालयानेही सीबीआय चौकशीचे आदेश दिले. तर राज्य सरकारने या आरोपांची समांतर न्यायालयीन चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली मार्च २०२१मध्ये चौकशी आयोगस्थापन करून चौकशी सुरू केली. आयोगाने चौकशीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, तक्रारदार परमबीर सिंह, सचिन वाझे, एसीपी संजय पाटील यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या साक्षी नोंदविल्या.

आरोप करण्यांऱ्या मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी चौकशी सातत्याने गैरहजर राहणे पसंत केले. आयोगाने परमबीर सिंग यांना दोन वेळा अनुक्रमे २५ आणि ५ हजारांचा दंड ही ठोठावला. अखेर हजर व्हा अन्यथा पोलिसांमार्फत जामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले जातील अशी तंबी ही दिली.

अखेर परमबीर सिंग यांनी आपल्याकडे काही नाही आणि आपल्याला काही सांगायचे नाही असे स्पष्ट करत मौन धारण केले होते. सुमारे एक वर्ष आयोगाने चौकशी करून अहवाल सादर केला.

मी अनिल देशमुख यांना पैसे दिले नाहीत; चांदीवाल आयोगासमोर वाझेची साक्ष

चांदीवाल आयोगासमोर वाझेची साक्ष झाली. १०० कोटी खंडणी वसुली प्रकरणात चांदीवाल आयोगासमोर मंगळवारी सचिन वाझे याची साक्ष झाली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी करण्यात आली. यावेळी अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांना समोरासमोर बसवून प्रश्न विचारण्यात आले.

यावेळी वाझे याने आपण अनिल देशमुख यांना कधीही पैसे दिले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच आपण अनिल देशमुख यांच्या कोणत्याही सहकाऱ्यांनाही पैसे दिले नसल्याचे सांगितले. परमबीर सिंग यांच्यानंतर वाझे यानेही देशमुख यांच्यावरील आरोपांबाबत उत्तर दिल्याने हे प्रकरण निकालात काढले जाण्याची शक्यता आहे.

१०० कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीने देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांनाही अटक केली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून खंडणी गोळा केली जात असल्याचा आरोप केला होता.

मात्र, चांदीवाल आयोगासमोर परमबीर सिंग यांनी आपल्याकडे तसे कोणतेही पुरावे नसल्याची कबुली दिली. आता सचिन वाझे यानेही पैसे न दिल्याचे सांगितल्याने देशमुख यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सिद्ध करण्यात ते यशस्वी होतील असे बोलले जात आहे.

Back to top button