बुलडोझरचा डोस | पुढारी

बुलडोझरचा डोस

काय हो आबुराव, एवढे घाबरेघुबरे होऊन कुठे जाताय?
पळा तुम्ही पण, बुलडोझर येतोय. घर गाठा. त्याच्यावर बुलडोझर फिरत नाहीये ना, हे बघा. मी तर चाललो बुवा!
बुलडोझरची एवढी दहशत?

मित्राची टपरी होती नदीकाठच्या रस्त्यावर. छान चालत होती बरीच वर्षं. नंतर हळूहळू करत मागेच एक खोलीपण बांधलेली त्याने. ती कालच्याला गेली की बुलडोझरखाली. बिचारा! हातापाया पडत होता त्या लोकांच्या. मांडवली करायला तयार होता, तरीपण सूड घेतल्यागत केलं लोकांनी.
सूड का घेईल कोणी?

एखाद्याचं चांगलं चाललेलं लोकांना बघवत नाही. मला सांगा, कोणाचीही राहती घरं, चालती दुकानं अशी हातोहात जमीनदोस्त करायची म्हणजे मनात केवढा सुडाचा अग्नी धगधगत असायला हवा! मी म्हणतो, हवं तर टाळे ठोका, बंदी घाला, मातीत का मिळवता?
त्याशिवाय बाकी कशानेही लोक ऐकत नाहीत. कायद्यांना जागत नाहीत याला काय करायचं?
आधी सांगून पाहायचं. नोटिसा द्यायच्या.

तसं सगळं करतात हो; पण त्यांना कोण विचारतो? आपण खुशाल हवं तिथे, हवं तसं घर, दुकान वगैरे उभं करून टाकायचं. एकदा बांधलं की राहील, वेळ येईल तेव्हा बघू पुढचं पुढं म्हणून स्वस्थ बसायचं. मांडवलीची तयारी ठेवायची. असंच आणि एवढंच करतात बहुतेक लोक!
करतात म्हणजे, जीवतोड कष्ट करतात हो. आयुष्याची पुंजी लावून बसतात त्यावर. सगळी घडी बसवताना वर्षं-वर्षं झुंजतात आणि एक दिवस बोळा फिरतो सर्वावर.

पण, एवढा खटाटोप करण्यापूर्वी सगळे नियम, कायदे, अटी समजून घेतात का?
घेत असतीलच की! कुठे काही चुकलं, तर निस्तरायला जरूर ते सल्लागार वगैरे असतीलच नेमलेले.
म्हणजे तज्ज्ञ नेमायचे ते फक्त चुका, गुन्हे निस्तरायला? टपरीवाल्या मित्राने असंच केलं होतं का?
माहिती नाही; पण वास्तुपूजा दणक्यात केली होती. अर्धा रस्ता भरेल एवढा मांडव घातला होता.
तो मांडव अजून ठेवला असेल ना?

कामाच्या गडबडीत राहिला असेल. मुळात दुकानाबाहेर मोठी पत्र्याची शेडतर अगोदरपासून आहेच बांधलेली. लोकांना उभं राहायला सावली भेटते तेवढीच.
वा! लोकांची फारच काळजी आहे तुमच्या मित्राला; पण मग रस्ता अरुंद होतो, वाहनं चालवायला जागा उरत नाही, ही गैरसोय कोणाची? लोकांचीच ना?

टपरीत शॉप अ‍ॅक्टचा परवाना पाहिलाय बरं का मी!
चला, तो तरी नीट आहे म्हणायचा; पण जमीन अधिग्रहणाचे, हस्तांतरणाचे कायदे असतात. शेतजमीन असेल तर धंदा करता येत नाही. अतिक्रमण चालत नाही. एकाने जमिनीवर अतिक्रमण केलं की, दुसर्‍या कोणाचा तरी ती जमीन वापरण्याचा हक्क गमावला जातोच की!
म्हणून काय डायरेक्ट बुलडोझर फिरवायचा?

अहो, त्या कारवाईलाही माणसंं लागतात, खर्च येतो; पण त्यामुळे निदान इतरांमध्ये जाग येते. भीतीपोटी तरी माणसं कायदे पाळायला लागतात. आपण काहीही करू आणि नंतर रेग्युलराईज करू, कायद्यात बसवून घेऊ हा भ्रम संपतो. बुलडोझरचा डोस असा लागू पडतो.
तेवढा कडू डोस नको. मी लवकर घरी जातोच कसा.
तुम्ही कुठे काही बेकायदा केलं नाहीयेत ना?

फार नाही, पण गॅलरी दोन फूट पुढे वाढवून खोलीसारखी बंद करून घेतलीये. मजल्यावरच्या सर्वांनीच! असंच होतं ना
आपल्याकडे. पण सगळ्यांची मनमानी सगळी व्यवस्था कोलमडवते. फार द्वेष, मत्सर वगैरे सोडा हो! सुखाने जगायचं असेल तर कायदे पाळा!

– झटका

Back to top button