पोलखोल सभेतील तोडफोड प्रकरण, चेंबूर पोलीस ठाण्यावर भाजपचा मोर्चा | पुढारी

पोलखोल सभेतील तोडफोड प्रकरण, चेंबूर पोलीस ठाण्यावर भाजपचा मोर्चा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पालिकेत ३० लाख कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजप पोलखोल अभियानाच्या माध्यमातून मुंबईकरांसमोर मांडणार आहेत. चेंबूर या पोलखोल अभियानाचे उदघाटन मंगळवारी होणार होते. मात्र त्याआधी सोमवारी मध्यरात्री रथाच्या गाडीची काच फोडण्यात आली. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

आरोपींच्या अटकेची मागणी केली होती. चेंबूर पोलिसांना आरोपींना २४ तासाच्या आत अटक करण्याची मागणी करून अटक न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज चेंबूर पोलीस ठाण्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. यामध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार सहभागी झाले होते. यावेळी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून जोरदार निदर्शने करत आहेत. आरोपींना तात्काळ अटकेची मागणी त्यांनी यावेळी केली.

यावेळी भाजप नेते प्रविण दरेकर यांनी पोलखोल रथावरील दगडफेकीचा निषेध व्यक्त करत प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, दगडाला दगडाने उत्तर दिले जाईल अशी वेळ आणू नका. आम्ही आरोपीबरोबरच त्यामागील सुत्रधार कोण आहे हे देखील शोधू. ही मुस्कटदाबी सुरूच ठेवली तर जशाच तसे उत्तर देऊ असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. मुंबईकरांचा कष्टाचा पैसा लुटला असा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.

भाजपकडून पोलखोल, तर शिवसेनेचा डब्बा गुल अशी टिका यावेळी भाजपचे माजी आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केली. भाजपच्या रथावर दगडफेक हा डरपोकणा आहे. दगडफेकी करणारांचा बोलविता धनी कोण आहे? दगडफेक करायची असेल तर समोर या असे मत व्यक्त करत आशिष शेलार यांनी खुले आवाहन दिले.

दरम्यान पोलिसांना भाजपकडून 24 तासांचा अल्टीमेटम दिल्याचे प्रसाद लाड यांनी सांगितले. त्याचबरोबर पोलिसांच्या ताब्यातील संशयितांचे राजकीय कनेक्शन असल्याचे मत यावेळई मंगलप्रभात लोढा यांनी केला.

हेही वाचा

Back to top button