सांगली : द्राक्ष वाढीसाठी पंचसूत्रीचा वापर करा | पुढारी

सांगली : द्राक्ष वाढीसाठी पंचसूत्रीचा वापर करा

सांगली; पुढारी वृत्तसेवा : द्राक्ष पिकातून कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळू शकते. मात्र त्यासाठी पाण्याचा वापर योग्य प्रमाणात करा, चार ते पाच पानांवर सबकिन करा, नऊ ते दहा पानांवर दुसरा शेंडा मारा, खुडा करू नका, औषध आणि खतांचा योग्य वापर या पंचसूत्रीचा वापर करा. येत्या काही दिवसांत द्राक्ष शेतीत मोठी क्रांती होणार आहे. त्यामुळे बागायतदार शेतकर्‍यांनी न घाबरता हिमतीने द्राक्ष शेती करावी, असा सल्ला द्राक्ष अभ्यासक मारुती चव्हाण यांनी दिला.

दैनिक पुढारी माध्यम समूह आणि जिल्हा कृषी विभागातर्फे आयोजित ‘अ‍ॅग्री पंढरी’ या कृषी प्रदर्शनाचे ‘द्राक्ष छाटणी व्यवस्थापन कमी खर्चात करणे, बदलत्या वातावरणात द्राक्ष व्हरायटी बदल’ या विषयावर ते बोलत होते. दिवसरात्र मेहनत करून शेतीचे उत्पन्न वाढत नाही. शेतीला ऊर्जितावस्था देण्यासाठी प्रदर्शनास भेट द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ते म्हणाले, देशातील 95 टक्के द्राक्ष पीक महाराष्ट्रात घेतले जाते. उर्वरित 5 टक्के कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात घेतात. देशाला 20 हजार कोटीचे परकीय चलन मिळवून देणारे हे हुकमी पीक आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 40 ते 50 लाख लोकांना द्राक्ष शेतीमुळे रोजगार मिळतो.

चव्हाण म्हणाले, कमी खर्चात एप्रिलमध्ये द्राक्षकाडी तयार करा. त्यासाठी गरज असेल तेवढीच फवारणी करा. ड्रिपमधून फवारणी देण्याचा मोह टाळा. बेसुमार खताचा वापर करू नका. छाटणीला सुरुवात झाल्यानंतर काड्या लांब ठेवा. तळातील एक डोळा ठेवून खरड छाटणी करा. बाग विरळणी स्टेजला आल्यानंतर दीड स्क्वेअर फुटाला एक काडी ठेवून विरळणी करा. नऊ ते दहा पानांवर शेंडा मारा. अनेकजण चार ते पाच वेळा खुडा करतात. परिणामी एकरी 25 ते 30 हजार खर्च विनाकारण होतो. योग्य वेळीच स्पे्र मारण्याचे नियोजन करा. उन्हाळ्यात बागेत शेणखत टाकू नका, ऑक्टोबरमध्ये खड्डा काढून झाडाच्या मुळात शेणखत टाका. कमी कालावधीत जास्त उत्पन्नाच्या वाणाचा वापर सुरू करा, असे ते म्हणाले.

Back to top button