इस्लामपुरात रस्त्यांची उंची चर्चेत | पुढारी

इस्लामपुरात रस्त्यांची उंची चर्चेत

इस्लामपूर; अशोक शिंदे :

शहरात व परिसरात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. यातील बहुतांश ठिकाणी आहे त्याच रस्त्यांवर मुरूमीकरण, खडीकरण, डांबरीकरण केले जात आहे. वर्षानुवर्षे असणार्‍या या कामांच्या पद्धतीमुळे रस्त्यांची उंची सर्वच ठिकाणी वाढत असताना आजूबाजूच्या घरांना, इमारतींना, दुकानांना याचा फटका बसत आहे.

कोणालाही आपले घर रस्त्यापेक्षा चार पायर्‍यावर चढून जाता येईल असे उंच असावे असे वाटते. मात्र, वर्षानुवर्षे प्रत्येकवेळी रस्ते तयार करत असताना संबंधित कंत्राटदारांनी रस्ते उकरून, पुन्हा मजबूत रस्ते तयार केले तर रस्त्यांची उंची वाढविण्याची आवश्यकता नसते. मात्र, कदाचित त्यांच्या कामाच्या पद्धतीत किंवा टेंडरमधील अटी, नियमानुसार त्यांना मिळणारा निधी अपुरा असू शकेल. मात्र, त्याचा जबर फटका आजूबाजूच्या घरांना बसू लागला आहे.

उंच झालेल्या रस्त्यांवरील पाणी घरांकडे, इमारतींकडे सहज जात आहे. इमारती खुज्या वाटू लागल्या आहेत. आपली घरे दुरुस्तीच्यावेळी उंच करणे किंवा आजूबाजूला भर टाकून पुन्हा त्याच्यावर फरशा टाकणे, असा लाखो रुपयांचा खर्च लोकांचा वाढत आहे. वास्तविक रस्त्यांना लागणारा निधी जर वाढवून दिला व संबंधित कंत्राटदाराने रस्ते उकरून पुन्हा मजबूत असे खडीचे थरावर थर घालून, पुन्हा दर्जेदार डांबरीकरण केल्यास आणि आहे तीच रस्त्यांची उंची पूर्ववत ठेवल्यास असे प्रश्न निर्माण होणार नाहीत. वर्षानुवर्षे चालत आलेल्या पारंपरिक रस्ते करण्याच्या या पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. नागरिकांना भुर्दंड लावण्यापेक्षा रस्त्यावर खर्च केला तर लोकांची या समस्येतून सुटका होऊ शकते. सध्या सुरू असलेल्या ताकारी रोड व वाघवाडी फाटा या रस्त्याबाबत ही अशीच रस्त्यांची उंची वाढली आहे. आजूबाजूची घरे, इमारती दुकानेही खुजी झाल्याचे दिसत आहे.

पालकमंत्री लक्ष देतील…

तालुक्यातील अनेकविध विकासकामांना कोट्यवधींचा निधी आणणे व बहुतांश विकासकामे ही संबंधित तज्ज्ञांना, स्थापत्य अभियंत्यांना बरोबर घेऊन, चर्चा करून दर्जेदार कामे करण्याचा प्रयत्न पालकमंत्री जयंत पाटील हे करत असतात. आता शहरातील व परिसरातील रस्त्यांच्या प्रत्येकवेळी फुटाफुटाने वाढत असलेल्या उंचीबाबतही त्यांनी रस्त्यांची उंची न वाढविता दर्जेदार रस्ते करण्याबाबत लक्ष द्यावे, अशीही मागणी होत आहे.

Back to top button