आता किरीट सोमय्याबाबत भाजप नेते का बोलत नाहीत ? संजय राऊत | पुढारी

आता किरीट सोमय्याबाबत भाजप नेते का बोलत नाहीत ? संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : विक्रांत निधी संकलन प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, त्यांचा आज (सोमवार) अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे सोमय्या यांना मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल करत पुन्हा एकदा आरोपांची सरबत्ती केली. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, सोमय्या पितापुत्र परदेशात पळून गेल्याची शंका येत आहे. केंद्र सरकारला लाज वाटत असेल, तर त्यांनी सोमय्यांची सुरक्षा काढून टाकावी. सोमय्या भाजपशासित राज्यात लपल्याचा संशय आहे. तर त्यांचा पुत्र नील गोव्यात किंवा गुजरातमध्ये लपून बसला असावा. किंवा सोमय्या पितापुत्र परदेशात पळून गेले असावेत. आता सोमय्याबाबत भाजप नेते का बोलत नाहीत, असा सवाल करत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

राऊत पुढे म्हणाले की, भाग सोमय्या हा नवीन चित्रपट काढवा. ते लोकांच्या भावनांशी खेळलेत आहेत. सोमय्या आता का पळ काढत आहेत. सोमय्या आता माजी गृहमंत्री अनिल देशुख आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या बाजूच्या तुरूंगात राहतील, असा दावा त्यांनी केला.

१४० कोटी रूपये जमा केल्याचे ट्विट सोमय्या यांनी केले आहे. मग त्यांनी गोळा केलेले ७११ डबे कुठे गेले ? सगळे पैसे निवडणुकीत वापरले आहेत. पैसे पक्षाकडे जमा केल्याचे ते सांगत आहेत. मग भाजपकडे जमा केलेले पैसे कुठे गेले ? विक्रांत वाचविण्यासाठी सोमय्या यांनी काय केले. सेव्ह विक्रांतच्या नांवे पैसे गोळा केले. विक्रांतच्या नावावर लिलाव मांडून पैसे गोळा करून त्यांनी देशद्रोह केला आहे. त्यांनी १३ वर्षे पैसे वापरले, आतापर्यंत त्यांनी हजारो कोटी उकळले आहेत. आता त्याचा त्यांनी हिशोब द्यावा.

सोमय्या एक ब्लॅकमेलर, चोर, लफंगा आहे. ईडीच्या कार्यालयात बसून सोमय्या काय करतात असा सवाल करून सोमय्या ईडीची भीती दाखवून पैसे उकळत आहेत, असा घणाघाती आरोपही राऊत यांनी केला. सोमय्यांची आणखी प्रकऱणे बाहेर काढणार असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले. आमच्यावर केलेले आरोप १० -१५ वर्षापूर्वीचे आहेत. मग सोमय्या यांचे प्रकरण आता बाहेर काढले तर बिघडले कुठे ? असा सवालही राऊत यांनी केला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button