सातत्याने ‘कर नाही, तर डर कशाला’ ? म्हणणाऱ्या किरीट सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार ! | पुढारी

सातत्याने 'कर नाही, तर डर कशाला' ? म्हणणाऱ्या किरीट सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार !

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाविकास आघाडी सरकारला स्थापन झाल्यापासून हैराण करून सोडलेल्या भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर अटकेची तलवार आहे. देशाचा अभिमान असलेल्या आयएनएस विक्रांत प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर आरोप करून एकच खळबळ उडवून दिली होती.

या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या आणि त्यांचे चिरंजीव नील यांनी भूमिगत होत वकीलांच्या मार्फत मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. आज न्यायालयाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. नील सोमय्या यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. दुसरीकडे किरीट सोमय्यांच्या वकीलांनी सत्र न्यायालयाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे.

संजय राऊत यांनी विक्रांत प्रकरणात ५८ कोटी हडप करून निवडणुकीसाठी वापरल्याचा आरोप केल्यानंतर किरीट सोमय्यांनी दोन दिवसांनी दोन मिनिटांनी पत्रकार परिषद गुंडाळत केवळ ३५ मिनिटे निधी गोळा केल्याचा दावा केला होता. याव्यतिरिक्त त्यांनी कोणती माहिती दिली नव्हती.

मानखुर्दचे माजी सैनिक बबन भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलिसांनी 7 एप्रिल रोजी सोमय्या पिता-पुत्रासह अन्य आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणात तपास करत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी माहिती हक्‍कानुसार राजभवनातून मिळालेल्या उत्तराचा आधार घेत सोमय्यांवर विक्रांत युद्धनौकेसाठीचा निधी हडप केल्याचा आरोप केला आणि त्यानंतर ही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली.

शनिवारी सकाळी 11 वाजता चौकशीला हजर राहण्याची नोटीस ट्रॉम्बे पोलिसांनी सोमय्या पिता-पुत्रांवर बजावली होती. मात्र, चौकशीला ते गैरहजर राहिले. काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर अनेक खळबळजनक आरोप केले होते. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता.

५८ की १४० कोटी ?

किरीट सोमय्यांनी विक्रांतसाठी ५८ कोटी रुपये गोळा केले व राजभवनात जमाच केले नाहीत, असा आरोप आहे. मी फक्‍त प्रतीकात्मक आंदोलन केले. ३५ मिनिटांत ५८ कोटी जमतील कसे, असा सवाल त्यावर सोमय्यांनी केला. मात्र, सोमय्यांच्याच जुन्या ट्विटचा आधार घेत राऊत यांनी ५८ कोटींचा आरोप आता १४० कोटींवर नेऊन ठेवला आहे. त्यामुळे पोलीस काय तपास करतात यावर या आरोप-प्रत्यारोपांचे भवितव्य अवलंबून आहे.

पैसे गेले कुठे ?

पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर हास्यास्पद असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. एका नागरिकाने वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे तक्रार नोंदवली. कोणताही पुरावा नाही. पोलिसांनी गुन्हा सिद्ध करावा, असे आव्हान त्यांनी दिले. मात्र, विक्रांतसाठी नेमका किती निधी जमवला होता आणि तो राजभवनात जमा केला नाही तर मग या निधीचे काय केले, याचा खुलासा मात्र सोमय्यांनी आतापर्यंत केलेला नाही.

हे ही वाचलं का ?

Back to top button