‘संजय राऊतांनी भाजपचे १०५ आमदार घरी बसवल्याने ‘ईडी’चा ससेमिरा’ | पुढारी

'संजय राऊतांनी भाजपचे १०५ आमदार घरी बसवल्याने 'ईडी'चा ससेमिरा'

नागपुर, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा नेमका गुन्हा काय, हे भाजपचे नेतेसुद्धा सांगू शकत नाही. २०१९ ची विधानसभा निवडणूक झाल्यावर दीड महिना ते दररोज टीव्हीवर आले होते. त्यांच्या प्रयत्नांतून भाजपचे १०५ आमदार त्यांनी घरी बसवले. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला एकत्र आणून शिवसेनेचा मुख्यमंत्री त्यांनी करून दाखवला, हाच राग भाजप नेत्यांच्या मनात आहे. यालाच ते गुन्हा मानत आहेत, म्हणून ईडीचा ससेमिरा राऊत यांच्या मागे लावण्यात आला असल्याचा घणाघाती आरोप युवा सेनेचे वरूण सरदेसाई यांनी केला.

नागपुर येथे विमानतळावर माध्यमांशी बोलताना ते म्‍हणाले, यावेळी त्यांच्यासबोत रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल, माजी जिल्हाप्रमुख सतीष हरडे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल काकडे आणि इतर पदाधिकारी होते. संजय राऊत म्हणजे शिवसेनेची बुलंद तोफ आहेत. ते केवळ सेनेचे नेतेच नाहीत, तर प्रमुख वक्ते आहेत. महाविकास आघाडीला एकत्र आणण्यात त्यांची काय भूमिका होती, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. त्यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घ्यायचे ठरवले तरी हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरतो, हेसुद्धा राज्याने पाहिले आहे. ईडीने त्यांच्यावर जी कारवाई केली, ती चूकीची केलेली आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर स्पष्ट झाले आहे.

निश्‍चय दौऱ्यासाठी विदर्भात

पुढे बोलताना वरूण सरदेसाई म्‍हणाले, युवा सेनेचा निश्‍चय दौरा महाराष्ट्रभर सुरू आहे. गेल्या आठवड्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्‍चिम महाराष्ट्र असा २ हजारपेक्षा जास्त किलोमीटरचा पट्टा टिमने पिंजून काढला. याच कार्यक्रमाअंतर्गत आम्‍ही नागपुरात आलो आहोत. नागपूर आणि शेजारच्या ४ जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. त्यानंतर अमरावतीला जाऊन तेथे पश्‍चिम विदर्भातील ५ जिल्ह्यांचा मेळावा घेणार आहोत. त्यानंतर उद्या गडचिरोली आणि आणि चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करणार आहो. गेल्या वर्षीसुद्धा आम्ही युवा सेनेचा पदाधिकारी संवाद दौरा आम्ही केला होता आणि विदर्भात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता, असे वरूण सरदेसाई म्हणाले.

तसेच, शिवसेना कुणाचीतरी बी टीम आहे, असा आरोप केला जातो, याबाबत विचारले असता सरदेसाई म्हणाले, असे अजिबात नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत आणि शिवसेना आता किंगमेकरच्या नव्हे तर किंगच्या भूमिकेत आहे. ही बाब विरोधकांना पचत नाही. त्यामुळे असे खोटे आरोप केले जात आहेत, असे सरदेसाई म्‍हणाले.

Back to top button