Sunflower Oil : रशियातून उच्चांकी दरात सूर्यफूल तेलाची खरेदी | पुढारी

Sunflower Oil : रशियातून उच्चांकी दरात सूर्यफूल तेलाची खरेदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : पेट्रोल, डिझेलपाठोपाठ देशातील खाद्यतेलाच्या दरात भडका उडण्याची चिन्हे आहेत. सूर्यफूल (सनफ्लॉवर) तेल तर अक्षरश: खवळणार आहे! रशिया-युक्रेन युद्धामुळे ही स्थिती ओढवली आहे. भारताने रशियाकडून उच्चांकी दरात सूर्यफूल तेलाच्या आयातीचा सौदा केला आहे. (Sunflower Oil)

भारत आजवर सूर्यफुलाचे तेल युक्रेनमधून सर्वाधिक आयात करत आला आहे; पण युद्धामुळे या देशातून होणारी आयात थांबलेली आहे. आता नाइलाजाने भारताने एप्रिलमध्ये 45 हजार टन सूर्यफूल तेल खरेदीचा व्यवहार रशियासोबत केला आहे.

रिफाइयनर्स मंडळींनी रशियाकडून टनाला 2 हजार 150 डॉलर दराने कच्चे सूर्यफूल तेल खरेदी केले आहे. यात किंमत, विमा आणि वाहतूक खर्चही अंतर्भूत आहे. युक्रेनवरील रशियन हल्ल्यापूर्वी हाच दर टनामागे 1,630 डॉलर होता.

सध्या भारतामध्ये सूर्यफूल तेलाची किंमत किरकोळ बाजारात 160 ते 180 रुपये लिटर आहे. नवी खेप आल्यानंतर या दरात 30 टक्क्यांपर्यंत वाढ शक्य आहे. म्हणजेच या तेलाचे दर 210 ते 240 रुपये लिटरपर्यंत भिडण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारीपासून भारतात खाद्यतेल दरात तेजी आहे. सूर्यफूल, वनस्पती, शेंगदाणे, मोहरी सगळ्याच प्रकारची खाद्यतेले महाग झाली आहेत. युक्रेन आणि रशिया जगातील सर्वांत मोठे सूर्यफूल तेल निर्यातदार आहेत.

भारतात दरवर्षी 25 ते 30 लाख सूर्यफूल तेल विकले जाते. यातील जवळपास 70 टक्के माल युक्रेनहून येतो. सन 2021 मध्ये भारताच्या एकूण खाद्यतेल आयातीत युक्रेन आणि रशियाचा वाटा 13 टक्के होता. याच दोन देशांकडून भारताने 16 लाख टन खाद्यतेल खरेदी केले होते.

sunflower oil : खाद्यतेल महागण्याची अन्य कारणे…

इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर बंधने घातली आहेत.
दक्षिण अमेरिकेत सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे.

…असे भडकले खाद्यतेल

फेब्रुवारीत भारतात सूर्यफूल तेलाच्या दरात जानेवारीच्या तुलनेत 4 टक्क्यांनी वाढ झाली. मोहरी तेलात 8.7 टक्क्यांनी वाढ झाली.

सोयाबीन तेलात किरकोळ 0.4 टक्के घसरण झाली. वनस्पती तेलाचे दर 2.7 टक्क्यांनी वाढले. शेंगदाणा तेलात एक टक्क्याने वाढ झाली.

देशात सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या पाम तेलात 12.9 टक्क्यांनी घसरण झाली. मात्र गतवर्षाच्या तुलनेत (फेब्रुवारी 2020) अद्यापही पाम तेलाचे दर 22.9 टक्क्यांनी जास्तच आहेत.

Back to top button