PM Imran Khan : इम्रान खान यांच्‍यावरील ‘अविश्‍वास’ साेमवारपर्यंत लांबणीवर | पुढारी

PM Imran Khan : इम्रान खान यांच्‍यावरील 'अविश्‍वास' साेमवारपर्यंत लांबणीवर

इस्‍लामाबाद : पुढारी ऑनलाईन

पाकिस्‍तानमध्‍ये इम्रान खान यांच्‍या नेतृत्‍वाखालील सरकारविराेधातील अविश्‍वास ठराव  लांबणीवर पडला आहे. आज पाकिस्‍तान संसदेत अविश्‍वास ठराव मांडण्‍यापूर्वीच सभागृहाचे कामकाज २८ मार्चपर्यंत तहकूब करण्‍यात आले. ( PM Imran Khan ) साेमवार २८ मार्च राेजी इम्रान खान यांच्‍या सरकारविराेधात अविश्‍वास ठराव मांडला जाईल, अशी शक्‍यता आहे.

आता पाकिस्‍तान संसदेचे कार्यवाही सोमवार, २८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता सुरु होणार आहे. यावेळी इम्रान खान सरकारवर अविश्‍वास ठराव मांडला जावू शकतो. पाकिस्‍तान संसद कामकाज नियमांनुसार, सरकारवर अविश्‍वास प्रस्‍ताव दाखल केल्‍यानंतर तीन दिवसांनंतर व सात दिवसांच्‍या आत मतदान घेणे अनिवार्य आहे. पाकिस्‍तान संसदेचे अध्‍यक्ष असद कैसर इम्रान हे मतदान टाळण्‍यासाठी प्रयत्‍न करत आहेत, असा आरोप विरोधी पक्षाच्‍या सदस्‍यांकडून होत आहे.

PM Imran Khan : इम्रान खान यांनी घेतली हाेती सुप्रीम कोर्टात धाव

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्‍या पक्षाच्‍या २४ खासदारांनी बंड केले . याविरोधात त्‍यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. बंडखोर खासदारांना अपात्र ठरवावे, असे आर्जव इम्रान सरकारने न्यायालयात केले होते. विश्‍वासदर्शक ठरावावरील मतदानात या बंडखोर सदस्यांची मते मोजली जाऊ नयेत, अशी विनंतीही सरकारने न्यायालयाला केली होती.

पाकिस्‍तान नॅशनल असेंबलीचे अध्‍यक्ष असद कैस यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्‍या विरोधातील अविश्‍वास ठरावावर चर्चा करण्‍यासाठी आज बैठकी बोलवली होती. मात्र  आज पाकिस्‍तान संसदेत अविश्‍वास ठराव मांडण्‍यापूर्वीच सभागृहाचे कामकाज २८ मार्चपर्यंत तहकूब करण्‍यात आले.  आता २८ मार्च राेजी हा ठराव सभागृहात मांडला जाईल, असे मानले जात आहे.

३४२ सदस्‍य संख्‍या असणार्‍या पाकिस्‍तान संसदेत बहुमतासाठी सरकारला १७२ सदस्‍यांची गरज आहे. निवडणुकीत इम्रान खान यांच्‍या तेहरीक-ए- इन्‍साफ पक्षाला १५५ जागा मिळाल्‍या होत्‍या. मागील आठवड्यात बिलावल अली झरदारी भुट्‍टो यांचा पाकिस्‍तान पीपल्‍स पार्टी, नवाज शरीफ यांचा पाकिस्‍तान मुस्‍लिम लीग आणि मुत्ताहिदा कौमी मुव्‍हमेंट यांनी सरकारविरोधात भूमिका घेतली. तर इम्रान खान यांच्‍या पक्षातील २५ खासदारांनी बंड पुकारले होते.

हेही वाचलं का? 

 

Back to top button