पुणे : महिला PSI ने बलात्काराच्या तक्रारीत तडजोड करायला लावून घेतले पाच लाख | पुढारी

पुणे : महिला PSI ने बलात्काराच्या तक्रारीत तडजोड करायला लावून घेतले पाच लाख

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : बलात्काराच्या तक्रार अर्जात एका व्यक्तीला तडजोड करण्यास भाग पाडून येरवडा पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षकाने संबंधीत व्यक्तीच्या थेट घरी जावून पाच लाख रुपये रोख व दहा लाख रुपयांचा बेअरर चेक जबरदस्तीने घेतल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनीच केलेल्या चौकशीत समोर आला आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे हा सर्व प्रकार विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दील असताना देखील महिला उपनिरीक्षकाने आपल्या पोलिस ठाण्याची हद्द सोडून आर्थिक कर्तव्यात सचोटी दाखवली आहे.

ऐरवी दोन पोलिस ठाण्याच्या हद्दीवर एखादा गुन्हा घडला, तर पोलिस तक्रारदाराला टोलवाटोलवी करून हेलपाटे मारायला लावातात. एवढेच नाही तर एका बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ अधिकार्‍याकडे असताना देखील कोणतेही अधिकार नसताना या महिला उपनिरीक्षकाने परस्पर तपास करून लॉज मालक साक्षीदाराकडे एक लाख रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे या महिला उपनिरीक्षकाने कर्तव्य बजावत असताना केलेल्या अत्यंत गंभीर, भ्रष्टाचारी कसुरीमुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबीत करण्यात आले आहे. मोहिनी डोंगरे असे निलंबीत केलेल्या महिला उपनिरीक्षकाचे नाव आहे.

पोलिस उपायुक्त परिमंडळ चार यांच्याकडून 31 जानेवारी रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार महिलेने एका व्यक्तीच्या विरुद्ध तक्रार अर्ज दिला होता. मात्र हा सर्व प्रकार विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील होता. तक्रारदार महिलेकडे डोंगरे यांनी चौकशी केली असताना त्या महिलेने दुसर्‍या एका व्यक्तीने देखील तिला त्रास दिल्याचे सांगितले. 7 जानेवारी रोजी उपनिरीक्षक डोंगरे यांनी त्या व्यक्तीला एका महिलेने तुमच्या विरुद्ध तक्रार अर्ज दिला असून, तुम्ही तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर त्या व्यक्तीला डोंगरे यांनी तक्रार दिलेल्या महिलेशी तडजोड करण्यास भाग पाडून पाच लाख रुपये रोख व दहा लाख रुपयांचा बेअरर चेक जबरदस्तीने घरी जावून घेतला. हा सर्व प्रकार घडल्यानंतर संबंधीत व्यक्तीने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे उपनिरीक्षक डोंगरे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. त्या तक्रार अर्जाच्या चौकशीदरम्यान, डोंगरे यांनी गैरकृत्य केल्याचे समोर आले.

तसेच डोंगरे ह्या 26 सप्टेंबर रोजी ड्युटी अधिकारी म्हणून कर्तव्यावर असताना, बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करताना, आरोपीने पिडीत मुलीचे चित्रीकरण सोशल मिडीयावर व्हायरल केले असताना देखील गुन्ह्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याचा समावेश केला नाही. त्यानंतर हा गुन्हा येरवडा पोलिस ठाण्याच्या गुन्हे निरीक्षकांकडे तपासासाठी वर्ग झाला होता. त्यानंतर डोंगरे यांनी परस्पर गुन्ह्यातील साक्षीदार लॉज मालक व इतर बारा साक्षीदार यांच्याकडे तपास केला. गुन्ह्याचा कोणताही अधिकार नसताना त्यांनी हा तपास केला. डोंगरे यांनी एवढ्यावर न थांबता आपल्या अधिकार कक्षात ही बाबा बसत नसताना देखील लॉजमालकाकडे चक्क एक लाख रुपयांची मागणी केली. हे सर्व प्रकार गंभीर असल्यामुळे चौकशीअंती डोंगरे यांचे खात्यातून तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.

Back to top button