आघाडीत खळबळ : भाजपची बी टीम म्हणून आरोप होणाऱ्या एमआयएमचा प्रस्ताव आहे तरी काय ? | पुढारी

आघाडीत खळबळ : भाजपची बी टीम म्हणून आरोप होणाऱ्या एमआयएमचा प्रस्ताव आहे तरी काय ?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणुकीत एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेससमोर युती करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि भाजप विरुद्ध महाराष्ट्र विकास आघाडी अशा राजकारणाची धुळवड सुरू झाली. काँग्रेस आणि शिवसेनेने एमआयएमशी युती करण्यास कडाडून विरोध केला.

उघड किंवा छुपी युती अशक्य असल्याचे शिवसेनेने जाहीर केले आणि काँग्रेसनेही एमआयएमशी आघाडी होऊ शकत नाही, असे बजावले. परिणामी, राष्ट्रवादीने सावध पवित्रा घेतला. आधी तुम्ही भाजपची बी टीम नसल्याचे सिद्ध करा, असे आव्हानच मग राष्ट्रवादीने एमआयएमला दिले. या गदारोळात शिवसेनेला खिंडीत गाठत भाजपने जोरदार टीकास्त्र सोडले. शिवसेना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांना आता ‘जनाब’ बाळासाहेब म्हणू शकते, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या मातोश्रींचे अलीकडेच निधन झाले. त्यांचे सांत्वन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जलील यांच्या निवासस्थानी भेट दिली. याच भाजपला रोखण्यासाठी एकत्र येण्याचा विषय निघताच खासदार
जलील यांनी राष्ट्रवादीसमोर युतीचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती टोपे यांनी उघड करताच राज्यभर राजकीय प्रतिक्रिया सुरू झाल्या.

संबंधित बातम्या

भाजपची बी टीम म्हणून आरोप होणाऱ्या एमआयएमचा प्रस्ताव काय ?

एमआयएमचा प्रस्ताव काय? आमच्यावर नेहमीच भाजपची बी टीम म्हणून टीका केली जाते. पण आता आम्ही भाजपला हरवण्यासाठी तुम्हाला युतीची ऑफर देत आहोत. आम्ही महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्यास तयार आहोत. आमचा निरोप शरद पवारांपर्यंत पोहोचवा. भाजपला हरवण्यासाठी आम्ही कोणत्याही पक्षासोबत युती करू शकतो, असे खासदार जलील यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचा संशय कायम

काँग्रेस, शिवसेनेचा विरोध पाहताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एमआयएमसोबत राजकीय चर्चा झाल्याची शक्यताच फेटाळली. पाटील म्हणाले, जलील यांच्या मातोश्रींचे निधन झाले म्हणून टोपे त्यांच्या घरी गेले होते. कुटुंब सदस्याचे निधन झाले असताना तिथे राजकीय चर्चा करणे ही राष्ट्रवादीची संस्कृती नाही. त्यामुळे अशा चर्चे वर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही, असे सांगतानाच एमआयएमच्या राजकीय चारित्र्यावर मात्र जयंत पाटील यांनी पुन्हा बोट ठेवले.

ते म्हणाले, आत्तापर्यंत उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात एमआयएम हा पक्ष भाजपचा बी टीम होता हे सिद्ध झाले आहे. ते बी टीम नसतील, तर मग आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीत त्यांची भूमिका काय आहे ? एमआयएमने आम्हाला भाजपच्या विजयात कोणताही रस नसल्याचे सिद्ध केले पाहिजे. त्यांनी समविचारी पक्षांना अपेक्षित भूमिका घ्यायला हवी. त्यांनी विखारी भाषा वापरू नये, असा सल्लाही पाटील यांनी दिला.

एमआयएम आघाडीत येण्यास इच्छुक : टोपे

टोपे म्हणाले की, औरंगाबाद येथील एमआयएमचे खा. इम्तियाज जलील हे माझे वर्गमित्र असून, त्यांनी माझ्याशी अनौपचारिक चर्चेत एमआयएम राज्यात महाविकास आघाडीमध्ये येऊ इच्छित असल्याचे सांगून याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी बोलावे असे सांगितले होते. एमआयएमला महाविकास आघाडीत घ्यायचे किंवा नाही, याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असेही टोपे म्हणाले.

ही तर भाजपची बी टीम : काँग्रेस

आधी एमआयएमने आपण भाजपविरोधी असल्याचे सिद्ध केले पाहिजे आणि मगच आघाडीबाबत चर्चा केल्या पाहिजेत, अशी भूमिका प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्‍ते अतुल लोंढे यांनी मांडली. महाराष्ट्रात भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत महाविकास आघाडी स्थापन केली असताना देशभरातील विविध राजकीय पक्षांनी मात्र आपण भाजपविरोधी असल्याचे भासवत लोकांची दिशाभूल केली. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी करून भाजपला फायदा होईल, अशा भूमिका सातत्याने घेतल्या. एमआयएमनेही लोकसभा आणि विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला पूरक भूमिका घेतल्या. त्यामुळेच देशातील जनता सुद्धा एमआयएमला भाजपची बी टीम म्हणते, असे त्यांनी स्पष्ट केले.

तिघांत चौथा नाही : राऊत

एमआयएमने राष्ट्रवादीला युतीचा प्रस्ताव देताच शिवसेनेत कमालीची अस्वस्थता निर्माण झाली. सर्वात पहिली आणि भाजपवर संशय घेणारी प्रतिक्रिया दिली ती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी. एमआयएमच्या या प्रस्तावामागे विरोधी पक्षनेते देवेंंद्र फडणवीस आहेत. ते कितीही चाणाक्ष असले तरी त्यांचे सगळे डावपेच अपयशी ठरत आले आहेत. हा डावदेखील त्यांचा यशस्वी होणार नाही, असे खैरे म्हणाले. तोच धागा पकडून शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रात तीन पक्षांचेच सरकार आहे आणि ते तीन पक्षांचेच राहील. यात चौथा कोण, पाचवा कोण यामध्ये तुम्ही कशाला पडता, असा सवाल राऊत यांनी एमआयएमला केला.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचारांनी चालणारे पक्ष आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे जाऊन गुडघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे. त्यामुळे ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही. एमआयएम आणि भाजपची छुपी युती आहे हे उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगालमध्ये पाहिलेले आहे, असा आरोपही राऊत यांनी केला.

एमआयएमचा सेनेला टोला

संजय राऊत यांच्या आरोपांना खासदार इम्तियाज जलील यांनी लगेच उत्तर देत सांगितले की, भारतात आणि महाराष्ट्रात राहणारा सर्व मुस्लिम समाज शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना आदर्श मानतो. ती फक्‍त तुमची मक्‍तेदारी आहे हे विसरून जा. आम्ही छत्रपतींच्या नावाचा वापर कधीही आपल्या राजकीय स्वार्थासाठी केलेला नाही, असा टोलाही जलील यांनी हाणला. समविचारी पक्ष एकत्र येत असतील

तर आनंदच : खा. सुळे

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याची खुली ऑफर दिली आहे. यासंबंधी बारामती दौर्‍यावर असलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारणा केली असता, समविचारी पक्ष एकत्र येत असतील तर आनंदाची गोष्ट असल्याचे त्या म्हणाल्या. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या विषयाला विरोध केल्याचे लक्षात आणून दिल्यावर सुळे म्हणाल्या की, नेमके काय झाले आहे, हे मला माहिती नाही. सगळा विषय समजून घेतल्यावर अधिक बोलणे सयुक्‍तिक ठरेल.

फडणवीसांचा सेनेला टोला

शिवसेना आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ म्हणू शकते. अजानची स्पर्धा शिवसेना घेऊ लागली आहेच. आता सत्तेसाठी शिवसेना काय काय करतेय ते पाहायचेय, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. भाजपला अडवण्यासाठी, पराभूत करण्यासाठी सर्व पक्ष एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सर्व एकत्रित आले तरी महाराष्ट्रातील जनता मोदींवर विश्‍वास ठेवणारी आहे, असा विश्‍वास व्यक्‍त करीत फडणवीस म्हणाले, हरले तर शिवसेनेला ईव्हीएम दिसते, त्यांना एमआयएम ही भाजपची बी टीम, सी टीम, झेड टीम दिसून येते.

हे ही वाचलं का ?

Back to top button