बेळगाव : मार्कण्डेय नदीत पडून मनोरूग्णाचा मृत्यू | पुढारी

बेळगाव : मार्कण्डेय नदीत पडून मनोरूग्णाचा मृत्यू

कंग्राळी खुर्द ; पुढारी वृत्तसेवा: कंग्राळी खुर्द गावच्या हद्दीतील मार्कण्डेय नदीवरील जुन्या पुलापाशी नदीतील पाण्यात पडून एका तरूणाचा मृत्यू झाला. या तरूणाचे नाव प्रसाद मादार ( वय २५ ) असे आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. प्रसाद हा मनोरूग्ण असल्याचे नातेवाईकांकडून समजले आहे.

पोलीसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद मादार हा मुळचा माडीगुंजी (ता. खानापुर) येथील असून आईवडील नसलेने पी. टी. कॉलनी नेहरूनगर येथील त्याच्या सिद्राय काकतीकर कांकाकडे राहत होता. प्रसाद शनिवारी सायंकाळपासून बेपत्ता होता. नातेवाईकांनी सोमवारी सकाळी एपीएमसी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.

याच दरम्यान मार्कण्डेय नदीकाठी असलेल्या महादेव मंदिरात महाशिवरात्रीची तयारी सुरु आहे. यामुळे ग्रामपंचायत सदस्य प्रशोत पाटील व कल्लापा पाटील यानी नदीकडे फिरण्यास गेले असता त्यांना जुन्या पुलाजवळ एक मृतदेह तरंगताना दिसला.

यानंतर त्यांनी ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लापा पाटील व एपीएमसी पोलीस स्टेशनाला याबाबतची माहिती दिली. पीएसआय मंजुनाथ बजंत्री, एएसआय आर, एम, कलादगी, सहकारी पट्टट यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनांसाठी हॉस्पिटलला पाठवून नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याच दरम्यान नातेवाईकांनी तो मनौरूग्ण असल्याचे सांगितले. घटनास्थळी बघ्यानी गर्दी झाली होती.

हेही वाचलंत का? 

Back to top button