पुणे : भारतातील ‘ती’ ४० परीक्षा केंद्रे पुणे पोलिसांच्या रडारवर | पुढारी

पुणे : भारतातील 'ती' ४० परीक्षा केंद्रे पुणे पोलिसांच्या रडारवर

पुणे, पुढारी वृत्तसेवा : आरोग्य भरती पेपरफुटी, म्हाडा आणि शिक्षकभरती गैरव्यवहारामध्ये पकडलेल्या काही एजंटचा देशातील विविध परीक्षा गैरव्यवहारांत संबंध असल्याचे आढळून आले आहे. त्यातच अटक करण्यात आलेल्या एका आरोपीकडे झालेल्या तपासात तो भारतातील 40 परीक्षा केंद्रात (लॅब) त्याच्या जाळ्यामार्फत छेडछाड करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातील मोठा मासा अटक झाल्यानंतरच सर्व छेडछाडीचा पर्दाफाश होण्यास मदत होणार असल्याची माहिती पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. दरम्यान ही चाळीस परीक्षा केंद्रे पुणे पोलिसांच्या रडारवर आली आहेत.

10 ते 15 वर्षांपासून अटक करण्यात आलेल्यांपैकी काही एजंट परीक्षा गैरव्यवहारात सक्रिय असल्याची माहिती समोर आली होती. आता अटक करण्यात आलेल्या एका आरोपीच्या अधिपथ्याखाली भारतातील 40 परीक्षा केंद्रावर परीक्षा होत होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच्या रॅकेटमार्फत परीक्षा केंद्रात छेडछाड होत होती.

एका परीक्षा केंद्रात परीक्षा देणार्‍यांची संख्या 250 अशा 40 केंद्रात तब्बल 10 हजार विद्यार्थ्यांना एकाच वेळी परीक्षा देण्याची क्षमता होती. ही चाळीस केंद्रे संबंधित आरोपीने मॅनेज केली होती. या चाळीस केंद्रातील परीक्षार्थी आरोपीच्या संपर्कात आल्याचे तपासात समोर आले आहे. नुकताच ऑनलाइन परिक्षामध्ये छेडछाड करण्यासाठी बिहारमध्ये प्रशिक्षण दिले जात असल्याचाही प्रकार समोर आला आहे. त्याच दृष्टीने पुणे पोलिसांचा तपास सुरू आहे.

पुणे सायबर पोलिसांनी आरोग्य भरती पेपरफुटी, म्हाडा पेपरफुटी, शिक्षकभरती घोटाळा या प्रकरणात आत्तापर्यंत वेगवेगळे पाच गुन्हे दाखल करीत 39 जणांना अटक करण्यात आली आहे. टीईटी 2019-20 गैरव्यवहार प्रकरणात 13 आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांचा देखील समावेश आहे.

Back to top button