किरीट सोमय्यांकडून १९ बंगल्यांचा सपशेल फुसका बार ! प्रसिद्धी स्टंट असल्याची अलीबागमध्ये चर्चा | पुढारी

किरीट सोमय्यांकडून १९ बंगल्यांचा सपशेल फुसका बार ! प्रसिद्धी स्टंट असल्याची अलीबागमध्ये चर्चा

अलिबाग; रमेश कांबळे : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भाजप आमदार प्रशांत ठाकूर व कार्यकर्त्यांसह आज कोर्लई  ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली असली तरी वादग्रस्त १९ बंगल्यांच्या जागेची पाहणी न करता त्यांनी कोरलई गाव सोडले व थेट रेवदंडा पोलिस ठाण्यात गेल्याने भाजपच्या सोमय्या यांच्या भेटीचा बार फुसका ठरला असून केवळ प्रसिद्धीचा स्टंट असल्याची चर्चा अलिबाग परिसरात दिसून येते. दरम्यान किरीट सोमय्या यांनी कोर्लई ग्रामपंचायत सोडल्यानंतर शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीची जागा दुधाने व गोमुत्राने पवित्र केली.

पोर्तुगीजकालीन असलेल्या कोर्लाई गावात सोमय्या दुपारी दीडच्या सुमारास पोचले होते. भाजपच्या कार्यकर्ते देखील सुमारे पाच किलोमीटर पासून कोरलाई गावापर्यंत रॅली सदृश्य सोमय्या यांच्याबरोबर होते. कोर्लई गावाला पोलिसांचा छावणीचे स्वरूप आले होते. ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले होते. ग्रामपंचायत परिसरात सोमय्या गेल्यानंतर त्यांच्या सोबत असलेले कार्यकर्ते भाजपचे झेंडे घेऊन गेले म्हणून उपस्थित शिवसैनिकांनी त्यावर आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजी केल्याचे केल्याने त्या ठिकाणी संघर्षाची तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी परिस्थिती यशस्वीपणे हातळल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

सोमय्या हे ग्रामपंचायत कार्यालयात गेले तेव्हा त्यांच्याबरोबर आमदार प्रशांत ठाकूर व भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. महेश मोहिते देखील होते. सुमारे दहा मिनिटात नंतर सोमय्या ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर आल्यानंतर वादग्रस्त जागेला भेट देतील असे अपेक्षित असताना सोमय्या यांनी थेट रेवदंडा पोलिस ठाण्यात रस्ता धरल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटले. सदर ठिकाणावर 19 बंगले असल्याचा सोमय्यांचा दावा होता म्हणून ते त्या ठिकाणी भेट देतील असे उपस्थितांना वाटत होते.

ग्रामपंचायत कार्यालयात आल्यानंतर आ. ठाकूर यांनी ग्रामसेवकांना अर्ज दिला व कोणतीही चौकशी न करता ते लगेच कार्यालयातून बाहेर पडले. सोमय्या यांची आजची भेट नौटंकी होती,” असा आरोप  सरपंच प्रशांत मिसाळ यांनी केला तर सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी सोमय्या गेल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय परिसर दूध गोमूत्र शिंपडले व पवित्र केल्याचे सांगितले.

रेवदंडा पोलिस ठाण्यात देखील सोमय्या सुमारे पंधरा मिनिटे थांबले होते

ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उत्तर देऊ शकले नाहीत. आम्ही मागितलेली माहिती दोन दिवसात देतो असे ग्रामसेवकांनी सांगितले तसेच गायब असलेल्या 19 बंगल्यांची चौकशी करा अशी मागणी रेवदंडा पोलिसांना केल्याचे सोमय्या यांनी पोलिस स्टेशन बाहेर आल्यानंतर पत्रकारांना दिली. “माफिया सरकारचे घोटाळे बाहेर येत असल्याने शिवसैनिकांची मनस्थिती मी समजू शकतो’, अशी खोचक टिप्पणी देखील श्री सोमय्या यांनी यावेळी केली. त्यानंतर ते जिल्हाधिकारी याना भेटावयास निघून गेले.

हे ही वाचलं का ?

Back to top button