मेड इन चायना टेस्ला कारचे भारतात स्वागत केले जाणार नाही; नितीन गडकरींची स्पष्टोक्ती | पुढारी

मेड इन चायना टेस्ला कारचे भारतात स्वागत केले जाणार नाही; नितीन गडकरींची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मेड इन चायना अर्थात चीनमध्ये बनणाऱ्या टेस्ला कारचे भारतात स्वागत केले जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी एका खाजगी दूरचित्रवाणीच्या वतीने आयोजित ‘ब्रेनस्टॉर्म बजेट’ नावाच्या कार्यक्रमात बोलताना केली. भारत एक मोठी बाजारपेठ आहे आणि जे येथे नाहीत, ते संधी गमावत असल्याचेही गडकरी यांनी यावेळी नमूद केले.
देशात आधीपासूनच बीएमडब्ल्यू, हुंडई, टोयोटा यासारख्या कंपन्यांच्या दर्जेदार गाड्या आहेत. इतकेच नाही तर टाटा आणि महिंद्रासारख्या देशी कंपन्या संशोधन आणि विकासकामात मग्न आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत विजेवर चालणाऱ्या गाड्या आणल्या जात आहेत. या कंपन्यांनी इथेनॉल व हरित इंधनावर चालणाऱ्या गाड्या आणण्याचा इरादाही जाहीर केलेला आहे. वाहन कंपन्या फ्लेक्स इंजिनवर काम करीत आहेत. इथेनॉलमुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. सर्व क्षेत्रात रोजगार निर्मिती व्हावी, हा आमचा उद्देश आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.

मुंबई-दिल्ली ग्रीन कॉरिडोर लॉजिस्टिक खर्च कमी होणार

दिल्ली ते मुंबई दरम्यान बनत असलेल्या ग्रीन एक्सप्रेसवे मुळे आगामी काळात लॉजिस्टिक खर्चात मोठी घट होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. ग्रीन कॉरिडॉरमुळे ट्रॅक्सच्या फेऱ्या यामुळे कमी होतील. सध्या मुंबई ते दिल्ली अंतर कापण्यासाठी 48 ते 54 तास लागतात, मात्र नवा कॉरिडोर बनल्यानंतर हा वेळ 18 ते 20 तासांपर्यंत खाली येईल.

Back to top button