अति-स्वस्त संगणक | पुढारी

अति-स्वस्त संगणक

गेल्या 60 वर्षांमधला संगणकाचा जीवनप्रवास थक्‍क करणारा आहे. संबंध खोली व्यापणार्‍या जुन्या महासंगणकापेक्षाही जास्त कर्तबगारी दाखवू शकणारा आजचा संगणक आपल्या शर्टाच्या खिशात मावतो हा तंत्रज्ञानाचा फार मोठा चमत्कार आहे. यामधले बरेचसे घटक पूर्वीचेच आहेत; परंतु उत्पादनाच्या नवनव्या पद्धतींमुळे त्यांचा आकार हजारो पटींनी घटवण्यात यश आले आहे. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक साधनांच्या व वस्तूंच्या किमतीही सतत कमी होत आहेत.

संगणकही याला अपवाद नाहीत. सुमारे 24 वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 1998 च्या आसपास ‘386’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या 32 किंवा फार तर 64 एमबी (लक्षात घ्या, एमबी – जीबी नव्हे) क्षमतेच्या डेस्कटॉप पीसीची किंमत तब्बल 40 हजार रुपये असायची! आज एवढ्या रकमेला मिळणार्‍या संगणकाची 386 बरोबर तुलना करणे हा वेडेपणाच आहे! तरीदेखील जे महाग तेच चांगले असे मानणार्‍यांचा एक फार मोठा वर्ग अजूनही अस्तित्वात आहे.

रास्पबेरी पाय् (Raspberry Pi) या नवीनतम संगणकाने त्यांची तोंडे चांगलीच बंद केली आहेत. ‘लाइनक्स’ /अँड्रॉईड या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणार्‍या या छोट्या संगणकामध्ये मल्टिमीडिया तर आहेच, शिवाय ओरिजिनल एक्स-बॉक्स कन्सोलदेखील. 1080 व्हिडीओ प्लेबॅक, पेंटिअम थ्री इतकी प्रोसेसिंग-क्षमता असलेला हा छोटासा संगणक 700 मेगाहर्टझच्या ARM चिपवर चालतो. हा 128 एमबी मेमरीचा आहे. याला मूळ एक यूएसबी पोर्ट आहे याची मूळ किंमत किती आहे; तर फक्‍त पंधरा डॉलर म्हणजे सुमारे हजार रुपये! याचे आताचे नवीन उत्पादन आहे, झीरो 2 डब्ल्यू.

पण, एवढ्या कमी किमतीला इतका चांगला संगणक बनवणे आताच शक्य कसे झाले? ही शंका कोणाच्याही मनात येईल. उत्पादनप्रक्रियांचा घटता खर्च आणि मोठ्या प्रमाणात केलेले उत्पादन यामुळे ग्राहकाला हव्या त्या गोष्टी पुरवणे गेल्या दशकात जमले आहे. शिवाय ग्राहकाच्या बर्‍याच गरजा हल्ली तुलनेने कमी किमतीच्या उपकरणांद्वारे देखील भागवल्या जाऊ शकतात.

सारांश असा की तुलनेने कमी पातळीवरील साधनांकडून देखील ग्राहकांच्या आवश्यक गरजांची पूर्तता होत असेल तर उच्च पातळीवरील (प्रीमियम) उपकरणांची मागणी थोडी घटणारच. एवढ्या किमतीत काय मिळते आहे, यापेक्षा काय मिळत नाही आणि त्याशिवाय आपले काम भागते आहे वा नाही असा उलटा विचार करणारेही भरपूर ग्राहक असल्याने ही नवी लाट सर्वच वस्तूंच्या बाबतीत आली आहे. म्हणजे असे की एखादी विशिष्ट गरज भागवण्यासाठी पूर्वीच्या संगणकांना, जरा जास्त खर्च करून, ‘ग्राफिक कार्ड’ बसवले जायचे.

कारण त्या वेळी प्रत्येक संगणकामध्ये सरसकट ग्राफिक कार्ड बसवलेले नसायचे. आता संगणकातच समाविष्ट असलेल्या ग्राफिक कार्डने संबंधितांच्या 90 टक्के गरजा भागत असतील तर उरलेल्या हिश्श्यासाठी खर्चिक कार्ड बसवायला बरेचसे लोक काचकूच करतात. कारण त्यांची मूलभूत गरज कमी किमतीच्या संगणकातील वाजवी किमतीच्या कार्डमुळे भागत असते.

विविध प्रकारच्या माहितीवर प्रक्रिया करण्याचा खर्च म्हणजेच ‘इन्फर्मेशन प्रोसेसिंग कॉस्ट’ कमी होत असल्यामुळेच वाजवी किमतीच्या संगणकामध्येही भरपूर सोयीसुविधांचा समावेश करणे शक्य झाले आहे. त्यामुळे अशा संगणकांचा वापर करण्यासाठी नवनवीन दालने खुली होत आहेत.

अर्थात, रास्पबेरी पाय्चे अनेक उपयोग व्यावसायिकांच्या ध्यानात आले आहेत ‘पायथॉन’ किंवा ‘सी’ सारख्या प्रोग्रामिग लँग्वेजवर चालणारा आणि मुख्यतः लहान मुलांसाठी तसेच शिकणार्‍यांसाठी उपयोगी पडणारा स्वस्त संगणक तयार करणे ही रास्पबेरी पाय्च्या उत्पादनामागील मुख्य प्रेरणा होती. आता तिने बराच मोठा प्रवास केला आहे हे नक्कीच. याविषयी अधिक www.raspberrypi.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

डॉ. दीपक शिकारपूर

Back to top button