Rahul Bajaj : बजाज समुहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचे निधन | पुढारी

Rahul Bajaj : बजाज समुहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : बजाज समुहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी पाच दशके बजाज समुहाचे नेतृत्व केले. त्‍यांनी 50 वर्षे कंपनीचे अध्यक्षपदही सांभाळले होते. 2001 मध्ये त्यांना सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

राहुल बजाज हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते जमनालाल बजाज यांचे नातू होते. राहुल यांचे शालेय शिक्षण दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून झाले. मुंबईच्या लॉ युनिव्हर्सिटीतून त्यांनी कायद्याची पदवीही मिळवली.

1965 मध्ये बजाज ग्रुपची कमान हाती घेतली…

राहुल बजाज यांनी 1965 मध्ये बजाज समूहाची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी भारत एक ‘बंद’ अर्थव्यवस्था होती. कंपनीचे नेतृत्व करताना त्यांनी बजाज चेतक नावाची स्कूटर बनवली. या स्कूटरने खूप नाव कमावले आणि भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबाच्या आकांक्षेचे सूचक मानले गेले. त्यानंतर ही कंपनी वाढतच गेली.

उदारीकरणानंतर बजाज शिखरावर गेले…

नव्वदच्या दशकात भारतात उदारीकरण सुरू झाले. भारत खुल्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करू लागला. अशात भारतीय दुचाकींना जपानी मोटरसायकल कंपन्यांकडून स्पर्धा मिळू लागली. अशा कठीण परिस्थितही राहुल बजाज यांनी कंपनीला पुढे नेले. बजाज ग्रुपची प्रमुख कंपनी बजाज ऑटोची उलाढाल 7.2 कोटी रुपये होती, जी आज 12,000 कोटी रुपये झाली आहे. तिच्या उत्पादनांचा पोर्टफोलिओही वाढला आहे. राहुल बजाज यांच्या नेतृत्वाखालीच त्यांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळाले.

राहुल यांचा जन्म 10 जून 1938 रोजी कोलकाता येथे मारवाडी उद्योगपती कमलनयन बजाज आणि सावित्री बजाज यांच्या घरी झाला. बजाज आणि नेहरू कुटुंबात तीन पिढ्यांपासून कौटुंबिक मैत्री सुरू होती. राहुल यांचे वडील कमलनयन आणि इंदिरा गांधी यांनी काही काळ एकाच शाळेत शिक्षण घेतले होते.

Back to top button