Dattatray bharane vs patil : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात पुन्हा संघर्ष | पुढारी

Dattatray bharane vs patil : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात पुन्हा संघर्ष

इंदापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचे पडघम सध्या वाजू लागल्याने इंदापूर तालुक्यात नेहमीप्रमाणे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा, राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. विकासकामांवरून राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षात राजकीय आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. भरणे व पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी विकासकामांच्या श्रेयावरून राजकीय चिखलफेक सुरू केल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. (Dattatray bharane vs patil)

इंदापूर तालुक्यात गट व गण रचनेत फेरबदलानंतर जिल्हा परिषदेचे दोन, तर पंचायत समितीचे चार गण वाढल्याने तालुक्यातून नऊ जिल्हा परिषद सदस्य, तर अठरा पंचायत समिती सदस्य निवडले जाणार आहेत. सदस्य संख्या वाढल्याने अतिरिक्त इच्छुक कार्यकत्यांना झुलवत ठेवण्याची नेत्यांना संधी मिळणार आहे.

मात्र काहीही करून पंचायत समिती व जिल्हा परिषदेत आपलेच उमेदवार जास्त निवडून आणण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात डावपेच आखण्यास सुरवात झाली आहे. यामध्ये दोन्ही नेत्यांचा कस लागणार आहे.

राजकीय प्रतिष्ठा वाढविण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कंबर कसली आहे. तर भाजपातील आपले स्थान वाढविण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील निवडणुकीत बाजी मारण्यासाठी व्यूहरचना आखण्यात दंग आहेत. ही निवडणूक जिंकून राज्य व देशपातळीवरील नेतृत्वाला साद घालत मोठ्या राजकीय पदावर वर्णी लावण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. आजी-माजी मंत्री आपल्या परीने जास्तीचा वेळ देत तालुका पिंजून काढत आहेत.

Dattatray bharane vs patil : पक्षांतर रोखण्याचे आव्हान

इच्छुकांची संख्या अधिक असल्याने सर्वच इच्छुकांना उमेदवारी देणे दोन्ही पक्षांतील नेत्यांना शक्य होणार नसल्याने इच्छुकांची नाराजी काढून समजूत घालणे दोन्ही पक्षांपुढे आव्हान असणार आहे. इच्छुक नाराज होऊन जर पक्षांतर केले तर त्याचा फटका आपल्या उमेदवाराला बसू नये यासाठी कसोशीने प्रयत्न करणे दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.

नवीन रचना कोणाच्या पथ्यावर?

तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट वाढल्याने व चार पंचायत समिती गण वाढल्याने सर्वच गटांतील गावांची अदलाबदल होणार आहे. पूर्वीचे बालेकिल्ला समजले जाणारे गटदेखील फुटणार असल्याने नवीन गट व गण रचना कोणाच्या पथ्यावर पडते हेदेखील या निवडणुकीत पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (Dattatray bharane vs patil)

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून विकासकामे मार्गी लावण्यावर राज्यमंत्री भरणे यांनी जोर दिला आहे. तालुक्यातील प्रत्येक गावाला कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन विकासकामे मार्गी लावण्यावर भर दिला असून गाव व वाड्यावस्त्यांवर विकासकामांचा ओघ सुरू आहे. सध्या तरी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून विकासकामांवर भर देऊन जनतेसमोर जाण्याची योजना राज्यमंत्री भरणे यांची दिसत आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी अत्यंत सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील गाव अन् गाव पाटील पिंजून काढत आहेत. लोकांनी सांगितलेल्या चुका दुरुस्त करण्याचे काम करत आहेत. कर्मयोगी साखर कारखाना व निरा-भीमा साखर कारखान्याच्या गाळपास आलेल्या उसाचे पैसेदेखील तातडीने जमा करण्यावर त्यांनी भर दिला आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी निरा-भीमा सहकारी साखर कारखाना व कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना बिनविरोध करत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अप्पासाहेब जगदाळे यांची बिनविरोध वर्णी लावत भाजपमध्ये चैतन्य निर्माण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तालुक्यात कोट्यवधींच्या विकासकामांमुळे कार्यकर्त्यांमध्ये जोर भरण्यात भरणे यशस्वी ठरत आहेत.

युवराज उतरणार का राजकीय आखाड्यात?

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन हे दोघे तालुक्यातील छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यामुळे दोन्ही नेते आपल्या युवराजांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या राजकीय आखाड्यात उतरवणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

Back to top button