UP Election : यूपीत आज पहिल्या टप्प्यातील मतदान | पुढारी

UP Election : यूपीत आज पहिल्या टप्प्यातील मतदान

लखनौ ; हरिओम द्विवेदी : उत्तर प्रदेश विधानसभेसाठी गुरुवारी (दि. 10) पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. कोरोना प्रोटोकॉलचे पालन करत सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होणार आहे. 50 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केले जाणार आहे. सर्व केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्रीय अर्धसैनिक दलाच्या 412 तुकड्या व पन्नास हजार जवान तैनात केले आहेत. या टप्प्यात 2 कोटी 27 लाख मतदार असून, 73 महिलांसह 623 उमेदवार रिंगणात आहेत. (UP Election)

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ‘उन्नती विधान’ या नावाने काँग्रेसचा जाहीरनामा बुधवारी घोषित केला. यामध्ये शेतकर्‍यांना कर्जमाफीसह महिलांना नोकर्‍यांमध्ये 40 टक्के आरक्षणाची घोषणा केली आहे.

10 लाखांपर्यंतचे उपचार मोफत, माजी सैनिकांसाठी विधान परिषदेत एक जागा राखीव ठेवली जाईल, झोपडपट्टीवासीयांना जमीन, प्रयागराज-वाराणसीत गंगा नदीला समर्पित उत्सव, 10 दिवसांत शेतकर्‍यांना कर्जमाफी, गहू-तांदळाची 2,500 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी, शेतकर्‍यांसाठी गोधन न्याय योजनेतून 2 रुपये किलोने शेण खरेदी केले जाईल, 20 लाख नोकर्‍या देऊ, त्यापैकी 40 टक्के नोकर्‍या महिलांसाठी आरक्षित असतील, आऊटसोर्सिंग बंद करू.

10 वी आणि 12 वीच्या मुलींना स्मार्टफोन, स्कुटी देऊ, अनुसूचित जाती-जमातींसाठी केजी टू पीजी शिक्षण मोफत, माध्यान्ह भोजन बनविणार्‍या आचार्‍यास पाच हजार रुपये मानधन, सरपंचांना पगारवाढ, दिव्यांगांना तीन हजार रुपये पेन्शन, वीज बिल निम्मे माफ केले जाईल, कोरोना पीडित कुटुंबांना 25 हजार रुपये मदत, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नातेवाईकांना 50 लाख रुपये भरपाई, दलित गृहमंत्री, कोल समुदायाला आदिवासी जमातीचा दर्जा, सर्व ओबीसी उपजातींना आरक्षण, इलेक्ट्रॉनिक बसेसची संख्या 2030 पर्यंत 6 हजार करणार आदी आश्वासनेही जाहीरनाम्यात दिली आहेत.

UP Election : द़ृष्टिक्षेपात पहिला टप्पा अकरा जिल्ह्यांतील

58 मतदारसंघ

623 उमेदवार रिंगणात;

9 मंत्र्यांचा समावेश

2 कोटी 27 लाख मतदार

10,766 मतदान केंद्रे

निवडणूक ‘वॉच’

पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींसोबतचे छायाचित्र सोशल मीडियात शेअर केले आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिली आहे की, ‘विजय सुनिश्चित है.’

उत्तर प्रदेशातील बाहुबली आमदार मुख्तार अन्सारी सध्या बांदा येथील तुरुंगात आहेत; तथापि त्यांना समाजवादी पक्षाचा सहकारी पक्ष सुहेलदेव भारतीय समाज पार्टीने मऊ येथून उमेदवारी घोषित केली आहे. मुख्तार अन्सारी यांनी सलग 5 निवडणुकांत विजय मिळवला. 1996 मध्ये बसपकडून, 2002 आणि 2007 मध्ये अपक्ष, 2012 मध्ये कौमी एकता दल, 2017 मध्ये बसपकडून ते विजयी झाले.

उत्तराखंडातील केदारनाथ येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सभा झाली. आश्वासनांच्या आधारे नको, तर रिपोर्ट कार्ड पाहून मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.

वाईट राजकारणामुळे उत्तर प्रदेशचे नागरिक भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रतिपादन बसपच्या प्रमुख मायावती यांनी केले.

Back to top button