भाजप आमदार नितेश राणे यांची पोलीस कोठडीत रवानगी | पुढारी

भाजप आमदार नितेश राणे यांची पोलीस कोठडीत रवानगी

सिंधुदुर्ग; पुढारी ऑनलाईन : भाजप आमदार नितेश राणे यांना पोलीस  कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला जामीनासाठीचा अर्ज त्यांनी आज माघार घेत कणकवली दिवाणी न्यायालयात शरण आले होते.

कणकवली दिवाणी न्यायालयात नितेश राणे शरण आल्यानंतर सुमारे तीन तास सुनावणी झाली. कणकवली दिवाणी न्यायालयाचे न्यायमूर्ती सलीम शेख यानी दिला निर्णय सुमारे 3 तास सुनावणी झाली. यानंतर न्यायालयाने ४  फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमा झाले होते.

शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी दाखल गुन्ह्यात आपल्याला अटक होऊ नये, यासाठी भाजपचे आ. नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयाकडे केलेला जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी फेटाळून लावला.

मात्र, सर्वोच्च न्यायलायाच्या आदेशानुसार आ. नितेश राणे यांना 6 फेब्रुवारीपर्यंत अटक करता येणार नसल्याने आ. राणे मंगळवारी घरी जाऊ शकले. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आ. नितेश राणे उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यांनी दाद न मागता अर्ज माघार घेतला होता.

दरम्यान, काल (०२) न्यायालयाच्या निर्णयाची ऑर्डर निघालेली नसतानाही आ. नितेश राणे न्यायालयाबाहेर पडण्यासाठी निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी आ. राणे यांची गाडी अडविली. त्यामुळे माजी खासदार नीलेश राणे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यामुळे न्यायालय परिसरातील वातावरण काल काही काळ गंभीर बनले होते.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी कणकवलीत हल्ला झाला. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते.

हे ही वाचलं का ?

Back to top button