रत्नागिरी : गणेशभक्तांना बाप्पा पावला! कोकण रेल्वे मार्गावर 5 विशेष गाड्या | पुढारी

रत्नागिरी : गणेशभक्तांना बाप्पा पावला! कोकण रेल्वे मार्गावर 5 विशेष गाड्या

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : पुढील महिन्यात गणेशोत्सवासाठी मुंबई पुण्यातून कोकणातून येणार्‍या नियमित गाड्यांचे आरक्षण या आधीच फुल्ल झाले असल्याने जादा गाड्या कधी जाहीर होतात याची प्रतीक्षा चाकरमान्यांकडून सुरू होती. शनिवारी रात्री गणेशोत्सवासाठी रेल्वेकडून कोकण रेल्वे मार्गावर पाच विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबई, नागपूर, पनवेल तसेच पुणे येथून या गाड्या कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत. या गाड्यांच्या घोषणेमुळे भाविकांना बाप्पा पावल्याचे बोलले जात आहे.

या बाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई सीएसएमटी-सावंतवाडी, नागपूर-मडगाव, पुणे-कुडाळ, पुणे थिवी तसेच थिवी-पनवेल मार्गावर या विशेष गाड्या धावणार आहेत. गणेशोत्सवासाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाड्यांमध्ये 01137/01138 ही गाडी 21 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत दररोज धावणार आहे. नागपूर-मडगाव ही गाडी आठवड्यातून दोनदा धावणार आहे. दि. 24 ऑगस्टपासून ही गाडी सुरू होणार आहे. तिसरी विशेष गाडी पुणे ते कुडाळ या मार्गावर धावणार आहे 01141/01142 या क्रमांकाने धावणारी ही गाडी 23 ऑगस्टपासून साप्ताहिक पद्धतीने चालवली जाणार आहे. गोव्यातील थीवी ते पनवेल या मार्गावर धावणारी गाडी 01145/011 46 या क्रमांकाने साप्ताहिक पद्धतीने धावणार आहे. ही गाडी 26 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावर जाणार आहे.

गणेशोत्सवासाठी धावणारी पाचवी विशेष गाडी गोव्यातील थिवी ते पनवेल स्थानकादरम्यान धावणार आहे. 01144/01143 या क्रमांकाने धावणारी ही गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे. दि. 27 ऑगस्टपासून ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. गणेशोत्सवासाठी जाहीर करण्यात आलेल्या या गाड्यांचे आरक्षण दि. 4 जुलैपासून रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण खुले होणार आहे.

Back to top button