कोकण : देवगड खालची बाजारपेठ येथे टेम्पोला अपघात | पुढारी

कोकण : देवगड खालची बाजारपेठ येथे टेम्पोला अपघात

देवगड, पुढारी वृत्तसेवा :  देवगड बाजारपेठ मार्गावरील उतारावरील हनुमान मंदिरानजीक टेम्पोचालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटून टेम्पो मोटारसायकलला धडकला. या अपघातात मोटारसायकलस्वार व टेम्पोमधील युवतीला किरकोळ दुखापत झाली. हा अपघात शनिवारी दुपारी 3 वा. च्या सुमारास झाला. दरम्यान दुचाकीला धडकल्यानंतर टेम्पो पुढे रस्त्याचा उजव्या बाजुला असलेल्या टेलिफोन खांबावर धडला व जागेवर थांबल्याने अनर्थ टळला.

नाडण येथील टेम्पोचालक महिंद्रा टेम्पो घेऊन देवगड खालची बाजारपेठ या दिशेने जात होता. हनुमानमंदिर नजीक असलेल्या धोकादायक वळणावरील उतारावर टेम्पोचालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले. याचदरम्यान अमरवाडीकडे जाणार्‍या रस्त्याने मोटारसायकलस्वार एस्टी कर्मचारी देवगड आगारात जात होते. नियंत्रण सुटलेला टेम्पोने प्रथम या मोटारसायकलला धडक दिली व पुढे जात समोर असलेल्या टेलिफोन खांबावर आदळला. तेथे उजव्या बाजुला खाली गोखले यांचे घर असून टेम्पो टेलिफोन खांबाला धडकून थांबला नसता तर सुमारे 15 फूट खाली असलेल्या गोखले यांच्या घराच्या अंगणात कोसळून भीषण अपघात होण्याची भीती होती.

या अपघातात टेम्पोमधील जामसंडे परिसरातील युवतीच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. तिच्यावर ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले.तर एसटी कर्मचारीच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. या अपघाताची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत देवगड पोलिस स्थानकात नव्हती

Back to top button