

बेळगाव पुढारी वृत्तसेवा : वडगाव येथे सोमवारी सकाळी झालेला खून दोन हजार रुपयांच्या व्यवहारातून झाला. महादेव मारुती जाधव (वय 50 मूळ रा. आंबेवाडी, सध्या रा. भारतनगर सहावा क्रॉस) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी सूरज पुंडलिक केदारीचे (वय 35 रा. नाझर कॅम्प, वडगाव) याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, महादेव हे मुळचे आंबेवाडीचे असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून ते भारतनगर येथील त्यांच्या मोठ्या बहिणीकडे राहतात. महादेव व सूरज हे दोघेजण गवंडीकाम करतात. सुरज हा महादेव यांचे दोन हजार रुपये देणे लागत होता.
घरासमोर दंगा व्यवहाराचे दोन हजार रुपये मागण्यासाठी महादेव सोमवारी सकाळी आठच्या सुमारास नाझर कॅम्पमधील सुरज याच्या घरी गेले.
घरासमोर थांबून ते आरडाओरड करत होते. सुरजने वडील आजारी आहेत, इथे दंगा नको चल आपण बाहेर जाऊन बोलू, असे म्हणत त्याने महादेवना बाहेर नेले. एका ठिकाणी बसून त्या दोघांनी मद्यप्राशन केले. यानंतर पुन्हा बाहेर पडले. दोघे जेव्हा येळ्ळूर क्रॉस येथील रिक्षा थांब्याजवळ आले तेव्हा महादेव यांनी सूरजकडे पुन्हा पैशाची मागणी केली. यावेळी दोघांत शाब्दिक चकमक उडाली.
दोघांमध्ये भांडण सुरू होताच रागाच्या भरात सुरजने स्वतः कडे असलेले रेडियम कटर महादेव यांच्या गळ्याला लावले. यावेळी महादेव यांच्या गळ्याची व सुरजच्या हातातील कटरची थोडीशी हालचाल झाल्याने धारदार कटर खोलवर घुसून गळा कापला गेला. कटर खोलवर घुसल्याने महादेव यांची श्वासनलिका तुटल्याने ते जागीच ठार झाले. ते पडल्याचे लक्षात येताच सूरजने येथून पळ काढला.
घटनेची माहिती शहापूर पोलिसांना कळताच पोलिस निरीक्षक राघवेंद्र हावलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृत महादेव यांचा मित्र व संशयित खुनी सुरज याने हा प्रकार केल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. शहापूर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. मृताच्या नातेवाईकांकडून माहिती घेऊन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.